मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने घवघवीत यश मिळवल्यांतर आता युतीने आगामी विधानसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. तर एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतही युती कायम राहील असे स्पष्ट केले आहे. तर मुख्यमंत्री कोण होणार? यावरून युतीमध्ये नवीन वादंग निर्माण झाले आहे. मात्र, दोन्ही पक्षप्रमुख याबाबत काही बोलायला तयार नाहीत.
भाजप की शिवसेना कोणाचा होणार मुख्यमंत्री? युतीमध्ये नवे वादंग नुकतेच युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी त्यांच्या ट्विटरवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बैठकीत महाराष्ट्रात अडीच-अडीच वर्षे शिवसेना-भाजपचा मुख्यमंत्री असेल, असे ठरल्याचे ट्विट केले होतं.
यावर शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी शिवसेनेमध्ये युतीबाबत कोणतीही नाराजी नाराजी नाही. निवडणुकीच्या पूर्वी जी युती झाली त्यामध्ये आधीच फॉर्म्युला ठरला आहे. याचा पूर्नउच्चर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद नसल्याचे कायंदे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या यादीत असल्याचे कोणीही अधिकृत जाहीर केले नसून ही चर्चा माध्यमामध्येच ऐकायला येते. याबाबत आदित्य किंवा उद्धव ठाकरे निर्णय घेतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.