मुंबई : अपुऱ्या फळ आणि भाज्या खाणे, रोजच्या जेवणामध्ये मिठाचा अधिक वापर, व्यायाम न करणे, सरासरीपेक्षा वजन अधिक असणे, तंबाखूचा अधिक वापर, उच्च रक्तदाब, साखरेचे प्रमाण अधिक, कोलेस्ट्रॉल आदी बाबी मुंबईकरांमध्ये आढळून आलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहाय्याने WHO STEPS SURVEY झोपडपट्ट्यां आणि चाळींमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
भारतात ६१ टक्के मृत्यू : तंबाखूचे वाढते प्रमाण, दारूचे व्यसन, रोजच्या आहारात फळ आणि भाज्यांचा अभाव, आहारात मिठाचा अतिवापर, चुकीची जीवनशैली आणि शारीरिक कसरतींचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. असंसर्गजन्य रोग आजारात अंतर्भूत हृदयरोग, कर्करोग, मधुमेह व तीव्र श्वसनाचे विकार हे प्रामुख्याने मृत्यूचे कारण आहे. असंसर्गजन्य रोगामुळे २०१६ मध्ये जगात ४० दक्षलक्ष नोंदणीकृत मृत्यू आहे, हे प्रमाण जागतिक मृत्यूच्या एकूण ७१ टक्के असून भारतामध्ये हे प्रमाण एकूण मृत्यूंच्या ६१ टक्के इतके आहे.
तीन टप्प्यात सर्व्हेक्षण :मुंबई शहरात ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या कालावधीत तीन टप्प्यांत राबविण्यात आले. यात प्रथम टप्प्यात सामाजिक-जनसांख्यिकीय आणि वर्तणूक संबंधित माहितीसाठी डेटा संकलन करण्यात आला. दुसऱया टप्प्यात उंची, वजन आणि रक्तदाब यांचा डेटा संकलन करण्यात आला. तसेच तिसऱया टप्प्यात रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉल पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी बायोकेमिकल मोजमाप करण्यात आले. सर्वेक्षण करण्यासाठी एकूण ५ हजार ९५० प्रौढांशी संपर्क साधण्यात आला, यापैकी ५ हजार १९९ प्रौढांनी सर्वेक्षणात भाग घेतला. यात २ हजार ६०१ पुरुष आणि २ हजार ५९८ महिलांचा सहभाग नोंदवण्यात आला आहे.
सर्वेक्षणाचे प्रमुख निष्कर्ष -
अपुरी फळे भाज्या खाणे :जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसनुसार, दररोज किमान ४०० ग्रॅम, फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने असंसर्गजन्य रोगाचा धोका कमी होतो. मुंबईतसुमारे ९४ टक्के नागरिक दररोज अपुरी फळे भाज्या खात असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे, जे शिफरस केलेल्या प्रमाणापेक्षा ५० टक्क्यांनी कमी आहे.
मिठाचा अधिक वापर :जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार दैनंदिन जीवनात मीठ सेवन करण्याचे प्रमाण ५ ग्रॅम असावे असे नमूद करण्यात आले आहे. परंतु, सर्वेक्षणात सरासरी दैनंदिन मिठाचे सेवन ८.६ ग्रॅम इतके असल्याचे आढळून आले आहे. जे खूप जास्त आहे.
शारीरिक व्यायामाकडे दुर्लक्ष :जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केल्याप्रमाणे दर आठवड्याला १५० मिनिटांचा व्यायाम करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणात जवळजवळ तीन-चतुर्थांश (७४.३ टक्के) म्हणजेच १० पैकी ७ मुंबईकर त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये योग, सायकलिंग, धावणे, चालणे, पोहणे, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल यांसारखे फिटनेस क्रीडा संबंधित शारीरिक हालचाली करत नाहीत असे आढळले आहे.