मुंबई - आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची नकारात्मक ओळख आहे. मात्र, आता याच धारावीची आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक ओळख निर्माण झाली आहे. दाट लोकवस्ती असताना ही धारावीतील कोरोनाची परिस्थिती योग्य प्रकारे नियंत्रणात आणल्याबद्दल धारावीचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे थेट जागतिक आरोग्य संघटनेने तोंड भरून कौतुक केले आहे. केवळ राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक ऐक्यातून या साथीला प्रतिबंध केला जाऊ शकतो, असे म्हणत आरोग्य संघटनेने 'मिशन धारावी'चे कौतुक केले. या कौतुकाबद्दल मुंबई महानगरपालिकेने जागतिक आरोग्य संघटनेचे आभार मानले आहे.
धारावीत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णसंख्या वाढतच गेली. धारावीत दहा लाखांहून अधिक लोक वास्तव्याला आहेत. याठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात 'पर्सनल स्पेस' ही संकल्पनाच अस्तित्त्वात नाही. एका छोट्याश्या खोलीत आठ-दहा लोक झोपतात, तिथे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यास, सांगणे हाच मुळात विनोद आहे. त्यामुळेच, याठिकाणी कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्याचे सगळ्यात मोठे आव्हान प्रशासनापुढे होते.