मुंबई:राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने आज एका प्रकरणात एफ आय आर दाखल करण्यात आला आहे हे नेमके काय प्रकरण आहे. तुमच्यावर आलेले संकट काय आहे अशी विचारणा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा गृहात उत्तर देताना सर्व घटनाक्रम सांगितला.
वडिलांना सोडवण्यासाठी कारस्थान : अनिल जयसिंग नावाच्या एका व्यक्तीची मुलगी गेल्या दोन वर्षांपासून माझी पत्नी अमृता फडणवीस हिच्या संपर्कात होती. माझ्या पत्नी सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे अनेकांच्या संपर्कात असते. एक ड्रेस डिझायनर म्हणून ही मुलगी संपर्कात आली. सुरुवातीला माझ्या पत्नीचा विश्वास संपादन करण्यासाठी सदर मुलीने विविध डिझाईन ड्रेस आणि त्याला अनुसरून असलेली ज्वेलरी वापरण्यास दिली. माझ्या पत्नीने परतही केली. मात्र त्यानंतर सदर मुलीने वडीलांच्या विरोधात अनेक केसेस दाखल असून त्या मागे घेण्यात याव्या त्यासाठी आपण मदत करा असा लकडा माझ्या पत्नीकडे लावला. मात्र जर काही अयोग्य असेल तर मदत करणार नाही असे माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितले.
अनेक बडया नेत्यांशी संबंध : आपला अनेक बड्या व्यक्तींची संबंध असल्याचे तिने फोन रेकॉर्ड वरून दाखवले. तसेच माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी गेल्या सरकारमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती मात्र त्यानंतर सरकार बदलले त्यामुळे त्यांच्यावरील केसेस मागे घेतल्या गेल्या नाहीत असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे यामध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि मोठ्या व्यक्तींची नावे आहेत ती मी आता सांगणार नाही असेही फडणवीस यांनी सांगितले.