मुंबई -राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत काय निर्णय होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी चार नावे राज्यपालांच्या मंजुरीसाठी दिलेली आहेत. आलेल्या सर्व नावांची पडताळणी करण्यासाठी राज्यपालांनी वेळ घेतला आहे. महाविकास आघाडीकडून जी नावे दिलेली आहेत, त्यावर राज्यपाल शिक्कामोर्तब करणार की, आक्षेप घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत ठराव
राज्यपाल नियुक्त सदस्यांची निवड करताना साहित्य, कला, संशोधन, विज्ञान, समाजसेवा आणि सहकार आदी क्षेत्रातील योगदान लक्षात घेतले जाते. मात्र, सत्ताधारी पक्षाकडून अनेकदा त्यांच्या पक्षातील अथवा जवळच्या मंडळींची वर्णी लावली जाते. मात्र, यावेळी राज्यपालांनी महाविकास आघाडीला रोखून धरण्यासाठी १२ सदस्यांच्या नियुक्तीचा विषय मागे टाकला होता. त्यामुळेच, महाविकास आघाडी सरकारकडून यासाठी शेवटी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव घेऊन त्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करून तो राज्यपालांना सादर करावा लागला होता.