मुंबई- एकेकाळी मुंबई-ठाण्यापुरती मर्यादीत असलेली शिवसेना आता गावागावात पोहोचली आहे. प्रत्येक दसरा मेळाव्याला सीमोल्लंघनाची गर्जना करणाऱ्या शिवसेना आणि ठाकरे यांनी स्वतःभोवती महाराष्ट्राची 'शीव' आखून घेतली होती. असे असले तरी सेनेचा आवाज पूर्ण भारतात ऐकला जायचा. मात्र आता लढाऊ सैनिकांची शिवसेना दरबारी राजकारण करायला लागली आहे. या शिवसेनेसाठी सत्ता हिच 'शीव' आहे का? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक वेगळे नाते आहे. गेली 57 वर्षे एकाच मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. बाळासाहेब ठाकरेंना ऐकण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्कवर येत होते. त्यांच्यासाठी ती एक पर्वणीच होती. मात्र आत्ताच्या आणि तेंव्हाच्या दसरा मेळाव्यात फरक आहे. तेव्हा शिवसेनेचा एक धाक होता. बाळासाहेबांचा शब्द अंतिम होता. आत्ताची शिवसेना तशी राहिली नाही. तडजोडीच्या राजकारणात ती अडकली आहे. सत्तेसाठी कमीपणा घेण्याची भूमिकाही शिवसेना सध्या घेताना दिसत आहे.
'मॉब लिंचींग' आपली संस्कृती नाही; हा शब्द पाश्चिमात्यांच्या धर्म ग्रंथात - मोहन भागवत
होय मी सत्तेसाठीच युती केली! हे वाक्य आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे. तर दुसरीकडे युतीत मी सांगेन तेच अंतिम असेल असे दरडावून सांगणारे बाळासाहेब ठाकरे. ते फक्त बोलायचे नाहीत तर युतीत तसे भाजपला करायला भाग पाडायचे. पण आता तसे आहे का? तर त्याचे उत्तर नाही असेच मिळते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेने भाजपसमोर सपशेल लोटांगण घातलेले दिसते. काल परवापर्यंत मोठा भाऊ, मोठा भाऊ करणारी शिवसेना गपगुमाने छोटा भावाच्या भूमिकेत कशी गेली हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले.