महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाना पाटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बनवण्यामागे काय आहे रणनीती? वाचा सविस्तर... - post of Speaker of Legislative Assembly

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद बदलाचे वारे वाहत होते. मात्र, हे पद कोणाला देणार, यासाठी देखील काँग्रेसमध्ये चुरस लागली होती.

Nana Patole
नाना पाटोले

By

Published : Feb 4, 2021, 11:00 PM IST

मुंबई - नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद बदलाचे वारे वाहत होते. मात्र, हे पद कोणाला देणार, यासाठी देखील काँग्रेसमध्ये चुरस लागली होती. प्रदेशाध्यक्षपद आपल्याला मिळावे म्हणून दिल्ली दरबारी अनेकांनी वाऱ्या केल्या. पण, शेवटी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावावर दिल्ली दरबारी शिक्कामोर्तब झाला.

हेही वाचा -एनसीबीच्या रडारवर आता मोहम्मद हुसेन बिलाल

नाना पटोले यांनी आपला अध्यक्षपदाचा राजीनामा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सोपवला. त्यानंतर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद नाना पटोले यांना मिळणार हे नक्की झाले.

नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून का झाली निवड?

सध्या महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हे बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. मात्र, बाळासाहेब थोरात हे सध्या राज्याचे महसूल मंत्री देखील आहेत. त्यामुळे, बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्ष पदाला योग्य तो न्याय देता येत नाही, असे काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. तसेच, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मंत्र्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याच्या अनेक तक्रारी दिल्लीच्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आल्या आहेत. यासोबतच महाविकास आघाडीत जे निर्णय सरकारकडून घेतले जातात, त्या निर्णयांमध्ये काँग्रेसला सामावून घेतले जात नाही, असाही आरोप काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी केला. त्यामुळे, काँग्रेस राज्यात सत्तेत असूनही दुजाभाव मिळत असलेल्या अवस्थेत होती. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्याने एक आक्रमक नेतृत्व काँग्रेसला लाभणार आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधताना किंवा वाटाघाटी करताना त्याचा उपयोग होईल, असे मत काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांचे आहे.

नाना पटोले यांचे व्यक्तिमत्व आक्रमक

नाना पटोले यांचे व्यक्तिमत्व आक्रमक असल्याकारणाने महाराष्ट्रात सामान्य माणसापासून दुरावलेली काँग्रेस पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचे काम नाना पटोले करू शकतील, असा विश्वास दिल्लीतील जेष्ठ नेत्यांना आहे. सध्या काँग्रेसमध्ये पाहिले तर नाना पटोले शिवाय इतर आक्रमक नेतृत्व नाही. यामुळे नाना पटोले यांना प्रदेश प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा दिली गेली आहे.

नाना पाटोलेंची ओळख

नाना पटोले विदर्भातील बहुजन समाजाचे आक्रमक नेते आहेत. १९९९ पासून काँग्रेस पक्षाच्या सलोली मतदारसंघाचे सातत्याने त्यांनी प्रतिनिधित्व केले. २००८ साली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेस वरिष्ट नेत्यांशी वाद झाल्याने त्यांनी काँग्रेसला राम राम ठोकला व २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ते आमदार झाले. २०१४ ला भाजपच्याच तिकिटावर लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते. पण, पंतप्रधान मोदी यांच्या शेतकऱ्यांविरोधी भूमिकेमुळे नाराज होऊन त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन मोदींशी दोन हात करून भाजप पक्षातून बाहेर पडणारे पाहिले नेते ठरले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून आले. या वेळी महाविकास आघाडीचे सरकार आल्याने भाजपशी दोन हात करणारे पाहिले नेते ठरल्याने नाना पटोले यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्ष पदाची माळ काँग्रेसने घातली.

आता विधानसभा अध्यक्ष पद कोणाला मिळणार?

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष नेमके कोण होणार याची देखील चर्चा रंगली आहे. यासाठी देखील काँग्रेसमधून काही इच्छुकांची नावे समोर येत आहे. असे असले तरी विधानसभा अध्यक्षाची माळ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गळ्यात पडणार असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप विधानसभा अध्यक्ष कोण असेल यासंबंधी दिल्लीच्या जेष्ठ नेत्यांनी कोणतीही चर्चा केली नसल्याचे मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्ष नेमके कोण होणार यासाठीचा निर्णय महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षश्रेष्ठी एकत्र बसून घेतील, असही अस्लम शेख म्हणाले. मात्र, विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा नाना पटोले यांनी दिला असल्याकारणाने आता हे पद राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी देखील खुले झाले असे म्हणत शरद पवारांनी विधानसभा अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. त्यामुळे, नेमका आता काँग्रेस पक्षात विधानसभा अध्यक्षपदी संदर्भात कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला दिले गेलं नाही तर राज्यात दुसरे उपमुख्यमंत्रीपद तयार करावे आणि ते काँग्रेसला देण्यात यावे, अशी मागणी जोर धरत असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, अशी कोणतीही मागणी काँग्रेसने केलेली नाही. या केवळ राजकीय वावड्या आहेत, असे म्हणत या चर्चेचे खंडन मंत्री अस्लम शेख यांनी केले. मात्र, राजकारणात काहीही होऊ शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात नेमके महाविकासआघाडीकडून कोणता निर्णय घेतला जातो आणि विधानसभा अध्यक्ष पदावर कोणाला बसवले जाते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा -आम्ही सरकारी कंपन्या विकू देणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details