मुंबई : भाजपाला पराभूत करण्यासाठी देशातील सर्व पक्ष एकजूट होणार आहेत. भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी वेळोवेळी बैठका केल्या आहेत. आता नितीश कुमार हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते तिसऱ्या आघाडीविषयीचा कानोसा घेतील. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून त्यांच्याशी तिसऱ्या आघाडीची चर्चा करणार आहेत. दरम्यान तिसऱ्या आघाडीविषयी विरोधी पक्षांमध्ये काहीना काही तरी कारणांमुळे विरोध होताना दिसतो. तिसरी आघाडी बनविण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी शरद पवार हे महत्त्वाची भूमिका बजावतील. पण वेळोवेळी त्यांनी केलेल्या आपल्या विधानामुळे आणि कृतीमुळे विरोधी पक्षांच्या मुठीतील एकतेची वाळू सरकू लागते.
राजकारणाची भाकरी:भाकरी फिरवली पाहिजे असे,विधान शरद पवार यांनी एका कार्यक्रमात केले होते. आता ही भाकरी फिरण्याचे विधान देशाच्या राजकारणासंदर्भात देखील लागू होते. देशात असलेली सत्ता उलथून लावण्यासाठी देशात नवीन एक आघाडी स्थापित करणे आवश्यक आहे. भाजपाविरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपाला आव्हान देणे आवश्यक आहे. परंतु भाजपाविरोधी शक्ती उभारताना भाकरीऐवजी शरद पवार यांचे विधान ३६० अंशात फिरताना दिसते.
चतूर राजकारणी : गेल्या काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला. जागोजागी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती पक्षातील नेते करत होते. भाजप व्यतिरीक्त इतर राजकीय पक्षांना शरद पवारांचा हा निर्णय एक धक्का होता. विरोधकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी शरद पवार हे हुक्मी एक्का आहेत, तेच नसतील तर भाजपाला पर्याय कसा देणार, अशी भीती इतर पक्षांच्या अध्यक्षांना होती. त्यामुळे पवार यांनी राजीनामा परत मागे घ्यावा यासाठी इतर पक्षांनीदेखील विनंती केली होती. दरम्यान शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राजीनामा मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राजीनामा देणं आणि मागे घेणे हा खेळ तीन दिवस चालू राहिला. परंतु या खेळात शरद पवार यांनी दोन पक्षी मारल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असून एक गट हा अजित पवार यांना मानतो. तर दुसरा साहेबांचा म्हणजे खुद्द शरद पवार यांना मानणारा.
दाखवली ताकद:अजित पवार हे भाजपमध्ये काही आमदारांसह जाणार असल्याचे म्हटले जातं होते. अजित पवार यांच्यामागे आमदारांची मोठा पाठिंबा आहे. परंतु पक्षात आपल्याला मानणारे अनेक आमदार आहेत, हे शरद पवार यांनी दाखवून दिले. त्याचप्रमाणे शरद पवार या नावामागे किती वलय आहे, याची प्रचिती इतर राजकीय नेत्यांनाही करून दिली. भाजपविरोधात एकत्र येणाऱ्या पक्षांनाही त्यांनी आपली ताकद दाखवून दिली.
ऐक्यासाठी किमान समान कार्यक्रम आवश्यक:मागील वर्षी राष्ट्रवादीचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते त्यावेळी शरद पवार यांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी मंत्र सांगितला होता. भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट पक्की असावी. विरोधी ऐक्यासाठी किमान समान कार्यक्रम महत्त्वाचा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी एकसारखी आहे. परंतु जेडीयू, सपा, माकप यांची वैचारिक मत भिन्नता असल्याचे ते म्हणाले होते.
काँग्रेसशिवाय पर्याय नाही पण.. :राष्ट्रीय अधिवेशनाच्यावेळी भाजपाविरोधात विरोधकांनी एकत्र येण्याची योजना आखली जात होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेस महत्त्वाचा पक्ष वाटत होता. तिसऱ्या आघाडीसाठी जोरात प्रयत्न केले जात होते. भाजपाविरोधात आघाडी करण्यासाठी काँग्रेस ठाम भूमिका घेत नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. भाजपाविरोधात आघाडी करण्यासाठी काँग्रेस महत्त्वाचा पक्ष असल्याचे शरद पवार त्यावेळी म्हणाले. परंतु ज्यावेळी भाजपाला चितपट करण्याची वेळ आली तेव्हा शरद पवार यांनी चार हात लांब राहणं उचित समजले.
अदानी प्रकरण : हा प्रसंग आहे, हिंडनबर्ग अहवालावरुन काँग्रेसने गौतम अदानींसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांची चौकशी केली जावी, अशी मागणी संसदेत केली होती. त्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका मांडली. गौतम अदानी यांना जाणूनबुजून टार्गेट करण्यात येत असल्याचं शरद पवार यांनी म्हटले होते.
नितीश कुमार होतील नंबर वन: राजकारणात आपले एक वेगळे वलय कसे आहे, याची जाणीव शरद पवार वेळोवेळी करून देत असतात. ठाकरे गटाचे खुद्दार नेते खासदार संजय राऊत यांच्या बोलण्यावरुन आपल्याला जाणवते. भाजपविरोधी गटाचे नेतृत्त्व शरद पवार यांनी करावे असे ते नेहमी म्हणतात. शरद पवार हे ज्येष्ठ राजकारणी आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा भाजपाविरोध गटाला होईल, असं म्हटलं जातं परंतु सध्या तिसरी आघाडीची मांडणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार करत आहेत.