मुंबई- आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम तिन्ही मार्गावरील लोकल सेवेवरही जाणवला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मरिन लाईन्स स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्याने सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वेची चर्चगेट ते मरिन लाईन्स दरम्यानची धीम्या मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. ती ११ वाजता सुरळीत झाली आहे.
ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत, तीन तासानंतर वाहतूक सुरळीत
आज सकाळीपासून पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स स्थानकाजवळ काही काम सुरू होते. यावेळी वाऱ्यामुळे स्थानकाजवळील ओव्हर हेड वायरीवर बांबू पडल्याने ती तूटली. वायर दुरूस्त करण्यात आले आहे. परंतु, या मार्गावर आता चाचणी सुरू असल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे.
ऐन सकाळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. चाकरमान्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे चर्चगेट ते मरिनलाईन्स स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली आहे. पश्चिम रेल्वेने दुरुस्तीचे काम हाती घेतली असून ३० मिनिटांत वाहतूक सुरळीत होईल, असा दावा पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला आहे.
मरिन लाईन्स स्थानकातील ओव्हरहेड वायर थोड्याच वेळापूर्वी दुरुस्त करण्यात आली आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने चाचणी सूरू होती. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. तर धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुंबई सेंट्रल येथून रवाना करण्यात येत होते. चाचणी यशस्वी झाल्यानंतर या मार्गावरील गाड्या पूर्वव्रत करण्यात आल्या आहेत.