मुंबई-पश्चिम रेल्वेची 'उत्तम' रेक असणारी लोकल महिला प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. चर्चगेट ते विरार मार्गावर तिची चाचणा घेण्यात आली असून बुधवारपासून या लोकलच्या नियमित 10 फेऱ्या होणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या 69 व्या स्थापना दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयींसाठी पश्चिम रेल्वेने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. या दिवसाचे निमित्त साधत मंगळवारी प्रायोगिक तत्वावर चर्चगेट ते विरार मार्गावर उत्तम रेक असणाऱ्या महिला विशेष लोकलची चाचणी घेण्यात आली आहे.
उत्तम रेक लोकल चर्चगेटहुन संध्याकाळी सव्वा 6 वाजता निघाली होती. ती विरारला रात्री 8 वाजता पोहचली. बुधवारपासून या लोकलच्या वेळापत्रकात प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन बदल करण्यात आले आहेत.
उत्तम रेकच्या सुविधा
- यात सामानाकरिता अधिक जागा
- चांगली आसनव्यवस्था
- डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
- प्रथम श्रेणीच्या डब्यातील आसनव्यवस्थेत बदल
- डब्याला निळ्या ऐवजी ब्राऊन रंग देण्यात आला आहे.
- संपूर्ण लोकलमध्ये सीसीटीव्ही
सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणारी ही पहिलीच नॉन एसी लोकल असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितले.