मुंबई - देशभरात कोरोना विषाणूने हाहाकार उडवला आहे. हजारो लोकांच्या मृत्यूनंतर हा विषाणू आता मुंबईत दाखल झाला आहे. हा आजार देशाबाहेरून प्रवास करून आलेल्या लोकांकडून पसरत आहे. यामुळे मुंबईकरांनी भीती बाळगू नये गरज नसल्यास उगाच मास्क वापरू नये, असे राज्य सरकार आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र, मुंबईत कोरोना विषाणूंच्या रुग्णांवर उपचार केल्या जाणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयात प्रश्नासनाचे धाबे दणाणले आहेत. धास्तावलेल्या या प्रशासनाने आता रुग्णालयात येणाऱ्या सर्वांनाचा मास्क लावण्याची सक्ती केली आहे.
चीनच्या वुहान प्रातांत कोरोना विषाणू आढळून आला होता. हा विषाणू काही दिवसातच जगभरात पसरला आहे. भारतातही या विषाणूचे ६० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी राज्यात ११ रुग्ण असून त्यातील २ रुग्ण मुंबईमध्ये उपचार घेत आहेत. मुंबईमध्ये महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये ६० खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्यात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या उपचारासाठी आयसोलेशनचा विशेष कक्षही उभारण्यात आला आहे. त्याठिकाणी डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॉय या व्यतिरिक्त कोणालाच प्रवेश दिला जात नाही. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू असले तरी संपूर्ण रुग्णालय परिसरात कर्मचारी आणि डॉक्टरांमध्ये भीतीचे वातारण पसरल्याचे चित्र दिसत आहे.