मुंबई -वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीची बाग) आतापर्यंत प्राण्यांचे फक्त संवर्धन केले जात होते. आता राणीच्या बागेत प्राण्यांचे प्रजनन केंद्र आणि रेस्क्यू केलेल्या प्राण्यांचे पुनर्वसनकेंद्र सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. राणीच्या बागेत 'मुक्त पक्षी विहार' दालन आणि प्राण्यांच्या अत्याधुनिक दालनांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली.
दोन वर्षांपूर्वी पेंग्विन आणले होते. त्यानंतर दर दिवशी ३० हजारांपेक्षा जास्त पर्यटक राणीच्या बागेत येऊ लागले आहेत. बागेच्या प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना नैसर्गिक अधिवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांना प्राणी पाहता यावेत यासाठी पिंजऱ्यांऐवजी काचेच्या भिंती लावण्यात आल्या आहेत. बागेत आत्तापर्यंत प्राण्यांचे संवर्धन केले जात होते. यापुढे प्राण्यांचे प्रजनन करू शकतो का? बचाव केलेल्या प्राण्यांचे या ठिकाणी पुनर्वसन करता येईल का? याचा विचार सुरू आहे. त्यासाठी लवकरच प्रजनन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे, असे आदित्य यांनी सांगितले.