मुंबई - भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे वादग्रस्त ठरत आहेत. भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिबा फुले यांच्याविषयी काढलेले उद्गार असतील, मंगल प्रभात लोढा यांनी शिवरायांची आणि मुख्यमंत्र्यांची केलेली तुलना असेल तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मात्र सातत्याने आपल्या वक्तव्यामुळे टीकेचे धनी होत आहेत. राज्यपालांनी सावित्रीबाई फुले, दादोजी कोंडदेव, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता ही राज्यपालांना ट्रोल करू लागली आहे.
पहिलेच वादग्रस्त राज्यपाल -वास्तविक राज्यपाल हे अतिशय मोठे आणि घटनात्मक पद आहे. या पदावरील व्यक्ती सहसा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेताना अत्यंत सावधगिरी बाळगत असते. कोणतेही सार्वजनिक वक्तव्य राज्यपाल पदावरील व्यक्ती आजपर्यंत टाळताना दिसत होती. मात्र, या घटनात्मक पदावर असतानाही भाजपाचे राज्यपाल भगतसिंह कुशारी यांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना अतिशय वादग्रस्त वक्तव्य केली आहेत असा ताजा इतिहास आहे. विशेषता महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वक्तव्य करून जनतेच्या भावनाही त्यांनी सातत्याने दुखावल्या आहेत. राज्यपालांच्या समर्थनासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही पुढे येता येत नाही ही त्यांची अडचण झाली आहे. राज्यपाल सातत्याने पक्षाला अडचणीत आणत असल्याने यासंदर्भात भाजपच्या बड्या नेत्यांनीही केंद्राकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.