मुंबई - आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्ला आमच्या व्यक्तीगत कामासाठी नाही तर तो जनतेच्या हितासाठी घेतो, असे विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (मंगळवारी) केले. मात्र, एखाद्या पक्षात चुकीचे होत असेल तर त्याचे भाजप समर्थन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हेही वाचा - भाजपकडून राज्यातील सर्वच्या सर्व 288 जागांसाठी चाचपणी सुरू - सुधीर मुनगंटीवार
शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी 'गरज पडली की, साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येऊनच साहेबांचेच कौतुक करायचं, आणि निवडणुकीची वेळ आली की, त्यांनीच विचारायचं की, साहेबांनी काय केले?' असे एक ट्वीट केले हेाते, त्यावर मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळांचा नाही - मुनगंटीवार
ते म्हणाले, पवारसाहेबांचा सल्ला आम्ही आमच्या व्यक्तीगत कामासाठी घेत नाही. त्यांचे सरकार असताना आम्ही सल्ले देत होतो, आणि ते ऐकत हेाते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकमेकांचे सल्ले घेत असतो, आमचे वैचारिक मतभेद असू शकतात, मात्र आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. आमच्यापैकी अनेक नेते आणि बारामतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले होते, त्यांनीही स्पष्टपणे आपण पवार यांचा सल्ला घेतो, असे सांगितले होते. यामुळे त्यात वावगे काय आहे ? मात्र, याचबरोबर एखाद्या पक्षात जर काही चुकीचे होत असेल तर भाजप त्याचे समर्थन कसे करणार ? असा सवालही मुनगंटीवार यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात युती कधी होईल याविषय प्रश्न उपस्थित केला असता ते म्हणाले, राज्यात कोणत्या क्षणी युतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू होईल. युती आणि जागावाटपाचे सर्व निर्णय अमित शाह, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार आहेत. ज्या जागांवर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो, अशा जागांवर समन्वयाने चर्चा केल्यानंतर तो विषय मार्गी लावणार येईल, असेही मुनंगटीवार म्हणाले.