मुंबई- राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळेल यासाठीच आम्ही फडणवीस सरकारला साडेचार वर्षांपूर्वी राज्यात सत्तेत आणून बसवले होते. मात्र, या सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. यामुळे येत्या विधानसभेत आम्ही या सरकारला सत्तेतून खेचून खाली आणू, असा इशारा धनगर समाजाचे नेते व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आज ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने वाट्टेल ते प्रयत्न केले. मात्र, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने समाजाची फसवणूक केली. आरक्षणासाठी काहीही ठोस पावले उचलली नाहीत. यामुळे धनगर समाजाची सरकारने घोर निराशा केली आहे आणि त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.