मुंबई Uddhav Thackeray : गेल्या अनेक दिवसांपासून चाललेला शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आज बुधवार (१० जानेवारी)रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय. त्यामध्ये खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असून, दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निर्णय दिलाय. त्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. त्यामध्ये त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदेंची होऊच शकत नाही. त्यांचं आणि शिवसेनेचं नातं तुटलय असं म्हणत शिवसेना आमचीचं असा पुन्हा एकदा दावा केलाय. तसंच, हा निर्णय आपल्याला मान्य नसून आपण सुप्रीम कोर्टात जाणार आहोत असंही ठाकरे यांनी जाहीर केलंय.
सुप्रीम कोर्टाचा अपमान : जर न्यायाधीश आरोपीची भेट घेत असतील तर यांच्याकडून कशी अपेक्षा करणार असं म्हणत, हा निर्णय म्हणजे मॅच फिक्सींग होती असा घणाघाती आरोपही उद्धव ठाकरे यांनी केलाय. जर घटना ग्राह्य धरत नाहीत तर आम्हाला अपात्र का केलं नाही, असा उलट प्रश्नही ठाकरे यांनी यावेळी केलाय. तसंच, या निर्णयाने नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचा अपमान केलाय असं म्हणत, यांनी स्वत:च्या अंगावर संकट ओढावून घेतलंय. तसंच, लोकही मोठ्या प्रमाणात संतापले असून, ही लढाई आता लोकांमध्ये होईल. लोकच यांना धडा शिकवतील असंही ठाकरे यावेळी म्हणालेत.