मुंबई -राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे आदेश लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी दिले होते. यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच याविरोधात देशातील विविध राज्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळे राजकारणही जोरदार तापले आहे. आता याप्रकरणासह सावरकर यांचा मुद्दाही पुढे आला आहे. राहुल यांच्या सावरकरांबद्दलच्या विधानाशी आम्ही सहमत नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी - याबाबत बोलताना माजी खासदार राहुल गांधी म्हणाले की, मी कुठल्याही पद्धतीने ओबीसी समाजाचा अपमान केलेला नाही. एक सरळ प्रश्न मी विचारला होता व तो भारताला लुटून परदेशात पळून गेलेल्या लोकांसाठी होता. उद्योगपती अदानी यांची संपत्ती कशी वाढली? ती संपत्ती वाढण्यासाठी कारणीभूत असलेल्या सरकारला माझा प्रश्न होता. या कारणासाठी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच माफी मागायला मी काही सावरकर नाही. मी राहुल गांधी आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.
विरोधात असलो तरी प्रत्येकाची स्वतंत्र भूमिका - माजी खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा माफी मागायला मी काय सावरकर नाही असा पुनरुच्चार केला होता. त्यामुळे यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया येणे साहजिकच होते. यावर आदित्य ठाकरे यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. अनेक पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. जसे आम्ही भाजपसोबत होतो तेव्हा त्यांनी पीडीपीसोबत जाण्याची भूमिका घेतली होती, ती आम्हाला मान्य नव्हती. परंतु तरीसुद्धा आम्ही त्यांच्यासोबत होतो. परंतु, राहुल गांधी यांची सावरकरांविषयीची भूमिका आम्हाला मान्य नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट असा नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे यांची टीका - विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपले आहे. या अधिवेशनाच्या कामकाजावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. अधिवेशनात विरोधकांना वेगळी वागणूक या सरकराने दिली आहे. आमचे मुद्दे त्यांनी ऐकून न घेतल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा -Rahul Gandhi Disqualification : माफी मागायला मी सावरकर नाही -राहुल गांधी