मुंबई:मुंबईत 30 जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून ते ३१ जानेवारीपर्यंत सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईतील १२ विभागात पाणी पुरवठा बंद असेल, तर दोन विभागात २५ टक्के पाणी कपात असणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबईत २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार, त्यामुळे काही भागातील पाणीपुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
या ठिकाणची कामे प्रगतीपथावर:मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे आणि पाणीपुरवठा प्रकल्प खात्याद्वारे पाणीपुरवठा विषयक सुधारणांची तसेच परिक्षणाची विविध कामे महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी हाती घेतली जातात. याच कामांचा भाग म्हणून भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४ हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे, इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत.
१२ विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद: या कामांच्या अनुषंगाने ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांपैकी १२ विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. तर २ विभागातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे जल-अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली आहे.