मुंबई- मुंबई महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून नालेसफाई केली जाते. मात्र, याच नाल्यात रहिवाशांकडून कचरा टाकला जातो. परंतु यापुढे कोणी कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कारवाईनंतरही कचरा टाकणे सुरुच राहिल्यास संबंधित विभागातील पाणी पुरवठाही खंडीत केला जाणार आहे, तसे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी प्रशासनाला दिले.
मान्सून पूर्व कामांचा खातेनिहाय आढावा आयुक्तांनी घेतला. यावेळी संबंधित कामे निर्धारित वेळापत्रकानुसारच गुणवत्तापूर्ण पद्धतीने करावीत, असे आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले.
मुंबई महापालिकेतर्फे दरवर्षी पावसापूर्वी मोठे नाले, छोटे नाले व रस्त्यालगतच्या गटारांची सफाईची कामे केली जातात. मात्र, नाल्याभोवती वसलेल्या झोपड्या, निवासी संकुलांतून कचरा थेट नाल्यात टाकला जातो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ व कचरा काढल्यानंतर कचऱ्याचे ढीग दिसून येतात. त्यामुळे पालिकेवर सर्व स्तरातून टीका होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने झोपडपट्टी, निवाससंकुलांतून वाहणाऱ्या नाल्याच्या कडेला 'जाळी' व 'फ्लोटिंग ब्रूम' बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकांना नाल्यात कचरा न टाकण्याबाबत जनप्रबोधन करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांची मदत घेतली जाणार आहे. वारंवार कचरा टाकला जात असल्यास प्रथम दंडात्मक कारवाई करावी, यासाठी मनुष्यबळाची नियुक्ती करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. मात्र, तरीही प्रतिसाद न मिळाल्यास संबंधित परिसरातील पाणी पुरवठा खंडीत करावा, असे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. तसेच पावसाळ्यादरम्यान पाणी साचण्याच्या ठिकाणांचा व तिथे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा अभ्यास गुणात्मक व संख्यात्मक स्तरावर करावा, असे निर्देशही परदेशी यांनी दिले आहेत.