मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात कमी पाऊस पडल्याने मुंबईत २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. पुढे ही पाणी कपात १० टक्क्यांवर आणली होती. मात्र, आता सातही धरणक्षेत्रातील एकूण जलसाठा ९५.१९ टक्के जमा झाला आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील पाणीकपात २९ ऑगस्टपासून मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे उद्या(शनिवार)पासून नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमध्ये पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. आज(शुक्रवार) सकाळी ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सातही धरणांतील एकूण जलसाठा हा ९५.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे ५ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेली पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यानुसार उद्या २९ ऑगस्ट पासून महानगरपालिका क्षेत्राला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर संबंधित गावांचा पाणीपुरवठा नियमित करण्याचेही ठरविण्यात आले आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.