महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंफाळ युद्धनौका भारतीय नौदलात दाखल, ब्राह्मोस क्षेपणास्त्रानं पूर्णतः सुसज्ज, राजनाथ सिंह यांच्या हस्ते जलावतरण

भारतीय नौदलाच्या ताफ्यात इंफाळ युद्धनौका दाखल झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मंगळवारी (26 डिसेंबर) इंफाळ युद्धनौकेचा नौदलात समावेश करण्यात आला.

Warship Imphal
इंफाळ युद्धनौका

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 3:53 PM IST

Updated : Dec 26, 2023, 4:46 PM IST

इंफाळ युद्धनौका भारतीय नौदलात दाखल

मुंबई :स्वदेशी बनावटीची आयएनएस इंफाळ युद्धनौका आज भारतीय नौदलात दाखल झाली. ही युद्धनौका ब्राह्मोस क्षेपणास्त्रानं पूर्णतः सुसज्ज आहे. त्यामुळं भारताची सागरी सुरक्षा क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते, आज मुंबईतील नौदल गोदीत इंफाळ युद्धनौकेचा लोकार्पण सोहळा पार पडला.

युद्धनौकेचा वेग ताशी ५६ सागरी मैल :इंफाळ या युद्धनौकेचं वजन 7400 टन असून लांबी 164 मीटर आहे. या युद्धनौकेवर विविध शस्त्रास्त्रं तसंच सेन्सर्स आहेत. त्याचबरोबर भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रं, जहाजविरोधी क्षेपणास्त्रं तसंच टोप्यार्डो आहेत. इंफाळ युद्धनौकेला कम्बाईन गॅस अँड गॅस प्रोपलशनची ताकद दिलेली आहे. त्यामुळं या युद्धनौकेचा वेग ताशी 56 सागरी मैल आहे. या युद्धनौकेच्या निर्मितीमध्ये 75 टक्के भाग भारतीय बनावटीचे आहेत.

INS इंफाळ चीनसाठी कर्दनकाळ : INS इंफाळची ब्रह्मोस पृष्ठभागावरून मारा करणारी क्षेपणास्त्रं, मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रं, पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर्स, 76 मिमी सुपर रॅपिड गन ही भारतीय बनावटीची आहेत. ही युद्धनौका बंदर तसंच समुद्रात चाचणी घेतल्यानंतर भारतीय नौदलाला 20 ऑक्टोबर 2023 रोजी सोपवण्यात आल्यानंतर समुद्रात तिच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. गेल्या महिन्यात या युद्धनौकेवरून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणीसुद्धा करण्यात आली होती. त्यामुळं चीनसारख्या देशासाठी ही युद्धनौका कर्दनकाळ ठरणार आहे.

युद्धनौका हेलिकॉप्टरनंसुद्धा सुसज्ज :आयएनएस इंफाळ युद्धनौका भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाकडं सुपूर्द करण्यात आली आहे. या युद्धनौकेची निर्मिती माझगाव डॉक लिमिटेडनं केली आहे. आतापर्यंत भारतात बनवलेल्या युद्धनौकेपैकी ही सर्वात ताकदवान युद्धनौका आहे. 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून युद्धनौकेची उभारणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणं या युद्धनौकेवर अत्याधुनिक टेहळणी रडार, जहाज रॉकेट लॉंचर्स, टोप्यार्डो लॉंचर्स, त्याचप्रमाणे पाणबुडी विरोधी युद्धासाठी हेलिकॉप्टरनंसुद्धा सुसज्ज आहे. तसंच ही युद्धनौका अणू, जैविक, रसायन युद्ध करण्यास पूर्णतः सक्षम आहे. या युद्धनौकेत मोठ्या प्रमाणात स्वयंचलित यंत्रणा असून यातील स्टेल्थ यंत्रणेमुळं मारक क्षमता वाढली आहे.

निर्मितीसाठी स्वदेशी पोलाद :ईशान्येतील महत्त्वाच्या शहराचं नाव दिलेली ही पहिली युद्धनौका आहे. 1891 चे अँग्लो-मणिपूर युद्ध असो किंवा 14 एप्रिल 1944 चे मोइरांग युद्ध असो, त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी INA ध्वज फडकवला होता. या युद्धनौकेला राष्ट्रपतींनी 16 एप्रिल 2019ला मान्यता दिली होती. ती संरक्षण मंत्रालयाच्या मुंबईतील माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड या शिपयार्डनं तयार केली आहे. इंफाळच्या उत्पादनासाठी स्वदेशी पोलाद DMR 249A वापरण्यात आलं आहे. INS इंफाळ ही विशाखापट्टणम श्रेणीतील युद्धनौकांच्या चार विनाशिकांपैकी तिसरी युद्धनौका आहे. भारतीय नौदलाच्या अंतर्गत असलेल्या वॉरशिप डिझाईन ब्युरो या संस्थेनं नौकेची रचना केली आहे.

काय म्हणाले राजनाथ सिंह :आयएनएस इंफाळच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आयएनएस इंफाळच्या उभारणीत सर्वांचं योगदान आहे. INS इंफाळ ही भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचं प्रदर्शन आहे. INS इंफाळ म्हणजे 'ज्याचे पाणी त्याची ताकद'. अलीकडच्या काळात समुद्राच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या आर्थिक, सामाजिक सामर्थ्यामुळं भारत अनेकांचं लक्ष्य आहे. भारतीय नौदलानं सागरी टेहळणी वाढवली आहे. समुद्रमार्गे होणारे व्यापार आकाशाच्या उंचाईपर्यंत गेले पाहिजे. त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आमच्या ताकदीवर पूर्ण विश्वास आहे, असंही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रसंगी बोलताना सांगितलं.

हेही वाचा -

  1. जहाजावर ड्रोन हल्ला प्रकरण; भारतीय नौदलानं अरबी समुद्रात केल्या युद्धनौका तैनात
  2. कर्नाटकमध्ये ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू, देशभरात कोरोना रुग्णसंख्या किती आहे?
  3. ब्रिटीश काळातील तीन कायदे रद्द, राष्ट्रपती मुर्मू यांनी तीन नवीन फौजदारी न्याय विधेयकांना दिली मंजुरी
Last Updated : Dec 26, 2023, 4:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details