मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांना आज मुंबईच्या सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्या नावे जारी केलेले वॉरंट अखेर आज रद्द करण्यात आले. त्यांच्यावर नारायण राणे यांची सभा उधळल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता. आज सत्र न्यायालयात स्वत: आमदार अजय चौधरी हजर झाल्यामुळे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी त्यांचे जामीन पात्र वॉरंट रद्द केले. आता अजय चौधरी यांनी सत्र न्यायालयाच्या समोर त्यांना पासपोर्ट मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे.
नारायण राणे यांची सभा उधळण्याचा प्रयत्न केला होता : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष सोडला होता. त्यानंतर त्यांनी त्यावेळेला मुंबईच्या सामना परिसरामध्ये सभा आयोजित करण्याचा प्रयत्न केला होता. ही सभा उधळून लावण्यासाठी शिवसेनेच्या त्यावेळच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्या प्रकरणात पोलिसांनी आमदार अजय चौधरी यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल केले होते. त्या संदर्भातील ही सुनावणी होती. परंतु या आधी झालेल्या सुनावणीच्या वेळी आमदार अजय चौधरी हे न्यायालयात हजर नव्हते, त्यामुळे त्यांच्या नावे हे वॉरंट काढले गेले होते.