मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून काही ठिकाणी रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागाने आजपासून पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, मुंबईसाठी रेड अलर्ट दिला आहे. पुढील ५ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20-22 जुलै दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिवृष्टी (115.6 मिमी-204.4 मिमी) होण्याची शक्यता आहे.
पुराचे पाणी रेल्वे ट्रकवर :कल्याणमधील मध्य रेल्वेच्या मार्गात पॉईंट बिघाड झाला आहे. तसेच अंबरनाथ आणि बदलापूर विभागादरम्यान पुराचे पाणी रेल्वे ट्रकवर आल्याने मध्य रेल्वेवरील अनेक गाड्या ठाणे आणि डोंबिवलीपर्यंतच चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यासोबतच पनवेल येथे 'पॉइंट बिघाड' झाल्याने पनवेल-बेलापूर हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा सकाळी 9.40 वाजता प्रभावित झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बेलापूर मार्गावर रेल्वे सेवा सुरू असताना, मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या 10-15 मिनिटे उशिराने धावत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.