मुंबई : Wagh Nakhe Jagadamba Sword : वाघनखं महाराष्ट्रात घेऊन येण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 1 ऑक्टोबरला रात्री लंडनला जाणार (Sudhir Mungantiwar To Visit UK) आहेत. याबाबतची Exclusive माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj) असलेली वाघनखं (Wagh Nakhe) ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात येणार आहेत. ब्रिटन सरकारकडून या संदर्भातील पत्र मिळालं असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
मुनगंटीवारांची 'ईटीव्ही भारत'ला खास प्रतिक्रिया : छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे राज्याभिषेकाचं 350 वं वर्ष आहे. अफजन खान यानं प्रजेवर अमानुष अत्याचार केला होता. अफजन खानानं क्रूरतेचा कहर केला. त्यामुळं संवादातून मार्ग काढण्यासाठी शिवाजी महाराज यांनी प्रयत्न सुरू केले होते. दोघांनी कोणत्याही सैन्य आणि शस्त्रांशिवाय भेट घेण्याचं ठरलं. मात्र, अफजल खान किती क्रूर आहे हे शिवाजी महाराज यांना माहिती होतं. भेटीवेळी अफजल खानानं दगा केला आणि शिवाजी महाराज यांना मारण्याचा डाव रचला. मात्र, त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाघनखांनी क्रूर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढत त्याला ठार केलं. त्यामुळं ही वाघनखं आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहेत. ती लंडनवरुन महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आपण 1 ऑक्टोबरला रात्री लंडनला जाणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
'जगदंब' तलवार आणण्यासाठी तांत्रिक अडचण : छत्रपती शिवाजी महाराज हे देव नाहीत, पण ते आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत. त्यामुळं वाघनखं लवकरच आणली जाणार आहेत. तसंच ते महाराष्ट्रात आणल्यावर त्याचं दर्शन शिवभक्तांना मिळावं यासाठी प्लॅन तयार करण्यात येत आहे. त्यासाठी मी आणि प्रधान सचिव 1 ऑक्टोबरला रात्री लंडनला रवाना होणार आहोत, अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली. तसंच जगदंबा तलवारसुद्धा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण काही तांत्रिक अडचणी यासाठी येत आहेत. केंद्र सरकारसोबत संवाद साधून ती अडचण दूर केली जाईल, पण सध्या ही प्रक्रिया थांबली असल्याचं मंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. त्याचवेळी प्रयत्न मात्र सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
विरोधकांना टोला : वाघनखं महाराष्ट्रात आणण्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली. तसंच यावरुन राजकारण सुरू आहे. निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांचा हा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावर मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, असा आरोप मूर्ख माणूसच करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा हा निवडणुकीचा कार्यक्रम नाही. भाजपा सत्तेत येणार आणि त्याचवर्षी 350 वा राज्यभिषेक सोहळा होईल, असं स्वप्न पडलं होतं का त्यावेळी? असा सवाल मुनगंटीवार यांनी विरोधकांना केला.