मुंबई - राजकीय श्रेयवादाच्या लढाईत अडकलेल्या वाडिया रुग्णालयाचा मुद्दा मंत्रीमंडळाकडे गेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये रुग्णालयाला 46 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे बुधवारपासून(15जानेवारी) वाडिया रुग्णालयातील सेवा सुरू होतील, अशी माहिती शर्मिला ठाकरे यांनी दिली.
वाडिया रुग्णालयाला सरकारकडून ४६ कोटींचा निधी
वाडिया रुग्णालयाबाबत बुधवारी शर्मिला ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत महानगरपालिका 22 कोटी आणि राज्यसरकार 24 कोटी रुपये, असे एकूण 46 कोटी रुपयांचा निधी वाडिया रुग्णालयाला देण्याचे आश्वासन अजित पवारांनी दिले. यावेळी मनसे महिला आघाडीच्या सरचिटणीस रिटा गुप्ता, मनसे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते.
हेही वाचा - 'भाजपच्या माफीनाम्यानंतर काँग्रेसचे टिळक भवन येथील आंदोलन रद्द'
भविष्यात वाडिया रुग्णालयाला निधीची कमतरता पडू नये, यासाठी येत्या दहा दिवसात अजित पवार स्वतः आढावा घेणार आहेत. सोमवारी वाडिया रुग्णालयाबाहेर मनसेने आंदोलन केले होते. त्यानंतर राज ठाकरेंनी फोनवरून अजित पवार यांच्याशी संपर्कही साधला होता, असे शिर्मिला ठाकरे यांनी सांगितले.
बुधवारपासून वाडिया रुग्णालयातील सेवा सुरू
मागील 90 वर्ष पालिकेच्या जमिनीवर वाडिया रुग्णालय सुरू आहे. लहान बालके आणि महिलांच्या उपचारासाठी वाडिया सर्वोत्कृष्ट रुग्णालय आहे. त्यामुळे आम्ही रुग्णालयाच्या बाबतीत राजकारण होऊ देणार नाही. जर वाडिया रुग्णालयात काही अनियमित कारभार झाला असेल, तर समिती त्याची चौकशी करेल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.