मुंबई - राज्यातील जवळपास ९८ हजार मतदान केंद्रांवर ईव्हीएमसोबतच मतपावती यंत्रणेचा (व्हीव्हीपॅट) वापर केला जाणार आहे. मात्र, निवडक २८८ मतदान केंद्रावरच या मतपावत्यांची मोजणी होणार आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ईटीव्ही भारतलाला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. ईटीव्ही भारतचे मुंबई ब्युरो चीफ प्रमोद चुंचूवार यांच्याशी केलेल्या खास चर्चेत शिंदे यांनी लोकसभा निवडणूक आणि तिचे नियोजन यावर विस्तृत माहिती दिली.
सर्वच मतदान केंद्रांवर होणार व्हीव्हीपॅटचा वापर, मतमोजणी मात्र निवडक केंद्रांवर
राज्यातील जवळपास ९८ हजार मतदान केंद्रांवर ईव्हीएमसोबतच मतपावती यंत्रणेचा (व्हीव्हीपॅट) वापर केला जाणार आहे. मात्र, निवडक २८८ मतदान केंद्रावरच या मतपावत्यांची मोजणी होणार आहे.
राज्यात जवळजवळ ९८ हजार मतदान केंद्रांवर ईव्हीएमला मतपावती यंत्रणा जोडण्यात आली आहे. या मतपावत्या ७ सेकंदासाठी व्हीव्हीपैट मशीनच्या पडद्यावर दिसतील आणि त्यामुळे आपण ज्यांना मत दिले त्यांनाच ते जाते की नाही याची खातरजमा मतदारांना करता येईल. त्यानंतर व्हीव्हीपॅट मशिनला जोडलेल्या पेटीत या मतपावत्या आपोआप जमा होतील. मात्र, सर्वच मतदान केंद्रावरील मतपावत्यांची मोजदाद केली जाणार नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील केवळ एका मतदान केंद्रावर या मतपावत्यांची मतमोजणी होईल. उर्वरित मतदान केंद्रांवर जर ईव्हीएम मधील मतांबद्दल उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीला काही गंभीर आक्षेप असतील आणि ते त्यांनी मतमोजणी सुरू असतांनाच नोंदवून मतपावत्यांच्या मोजणीसाठी मागणी केली तर निवडणूक अधिकारी मतपावत्या मोजणीचा निर्णय घेऊ शकतात, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मतदारांना मतदानाकडे वळविण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे विविध उपक्रम राज्यभर राबविले जात आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एका मतदान केंद्रावर सर्व महिला कर्मचारी नेमून महिला सशक्तीकरणाचा संदेश दिला जात आहे. तसेच दिव्यांग, अंध मतदारांसाठीही विशेष सुविधा दिल्या जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले.