मुंबई -मेट्रो कारशेड उभारण्यासाठी आरेतील 2700 झाडे तोडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौक आणि पिकनिक पॉईंट येथे आज मुंबई काँग्रेसच्या वतीने जुन्या वृक्षांचे वृक्षपूजन करण्यात आले. यावेळी, संजय निरुपम यांनी वृक्षतोडीला विरोध करत असल्याचा केवळ दिखावा करत असल्याचा आरोप शिवसेनेवर केला आहे.
निरूपम म्हणाले, शिवसेनेना केंद्रात सत्तेत आहे. महापौरही सेनेचाच आहे. एकीकडे आरे कारशेड प्रस्तावित विकास आराखड्यावर तुम्ही मोहर लावता आणि दुसरीकडे झाडे तोडण्याचा प्रस्ताव आला की विरोध करता. खरच शिवसेना कारशेड विरोधात आहे तर त्यांनी सरकार मधून बाहेर पडावे. भाजप बरोबर संबंध तोडून निवडणूका लढवावी. नाहीतर सेनेची भूमिका आम्ही दिखावाच समजू.
उपस्थितांनी यावेळी 'कारशेड हटाव, आरे बचाव' च्या घोषणा दिल्या. आमचा मेट्रोला विरोध नसून झाडे तोडण्याला विरोध असल्याचे संजय निरुपम यांनी यावेळी स्पष्ट केले. आरेला वाचवून येथे येणाऱ्या बिल्डर लॉबीला हटवण्याचे काम मुंबई काँग्रेस करणार असल्याचेही निरुपम म्हणाले.