मुंबई -संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील ३२३७ उमेदवारांच भवितव्य आज ठरणार आहे. मतदारांचा कौल कोणाला मिळणार, याची उत्सुकता ताणली आहे. मात्र, मतदानावर पावसाचे सावटही पाहायला मिळत आहे. रिमझिम पावसामध्ये मुंबई शहरातील ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातील सायन कोळीवाडा या विधानसभा मतदारसंघातील प्रतिक्षा नगर या मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. राजकीय प्रतिनिधी सोबत पुढची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात मतदान देखील सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा -राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात
भारतीय हवामान विभागाने पुढील २ ते ३ दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आजही दिवसभर रिमझिम पाऊस सुरु राहणार, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सरकारने मतदानासाठी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मतदार नागरिक उस्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावतील, अशी अपेक्षा आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच वेळेस एकाच टप्प्यात ही मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. आज मतदान पार पडल्यानंतर येत्या २४ तारखेला मतमोजणी होऊन राज्याच्या सिंहासनावर कोणाची सत्ता येईल हे स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा -विधानसभा निवडणूक LIVE : राज्यात सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात, अमरावतीत शेतकरी संघटनेच्या उमेदवाराच्या गाडीवर गोळीबार झाल्याची चर्चा