नागपूर :काँग्रेसला मत देणे म्हणजे देशात अराजकता निर्माण करणे आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत स्वतंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता. आता कर्नाटक सरकारने आदेश देऊन त्यांनी वीर सावरकरांचा अभ्यासक्रमातला धडा काढून टाकला आहे. एवढेच नाही तर धर्मांतर बंदी कायदा रद्द केला आहे. भविष्यात गोहत्या बंदीचा कायदा रद्द करतील. काँग्रेसला दिलेले एक मत म्हणजे किती मोठी चूक आहे, याचे कर्नाटक उदाहरण आहे. आता उद्धव ठाकरे यांनी लंडन मधूनच भूमिका स्पष्ट करावी की त्यांना कर्नाटकमध्ये झालेल्या प्रकार मान्य आहे का, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे भविष्यातही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? हे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे. उद्धव ठाकरेंनी कर्नाटकाच्या मुद्द्यावर आजच त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. एक मत काँग्रेसला आणि एक मत भाजपला काय करू शकतो हे कर्नाटकच्या प्रकरणावरून दिसून येत आहे असे बावनकुळे म्हणाले.
अजित पवारांना योग्यवेळी उत्तर देऊ :काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तेपासून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता असे समीकरण राहिले आहे. अजित पवारांनी सरकार बद्दल आरोप करणे म्हणजे सरकार योग्यवेळी उत्तर देईल. दीपक केसरकर यांनी अजित पवारांना जी ऑफर दिली आहे, त्याचे उत्तर अजित पवारांनी दिलेले बरे.
आशिष देशमुख संघटनात्मक काम करतील :आशिष देशमुख यांनी राहुल गांधींच्या ओबीसी विरोधी भूमिकेबद्दल प्रश्न विचारले, म्हणून नाना पटोलेनी त्यांना पक्षातून काढून टाकले. जर ओबीसींबद्दल मत मांडणे काँग्रेसमध्ये चुकीचे असेल आणि पक्षातून काढले जात असेल तर भाजप ओबीसीच्या सन्मान करतो. यावेळेला आशिष देशमुख यांनी पद किंवा उमेदवारी मागितलेली नाही ते संघटनात्मक काम करण्यासाठी येत आहेत. तेलंगणातील BRS मॉडेलमध्ये किती चुका आहेत याचा व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येऊ, असेही ते म्हणाले.