मुंबईVoters Number Increased :लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचं अध्यायवतीकरण करण्याचं काम निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. यासाठी दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. 27 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती देताना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितलं, की राज्यात सत्तावीस ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे :18-19 नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी महिला, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मतदान नोंदणीसाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, निवडणूक साक्षरता मंडळाचं सहकार्य, तर महिलांच्या मतदार नोंदणीसाठी महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या शासकीय विभागांचं सहकार्य घेण्यात येणार आहे. राज्यातील तृतीयपंथी व्यक्ती, भटकया विमुक्त जमाती यांच्यासाठी दोन, तीन डिसेंबरला विशेष शिबिर आयोजित केलं जाणार आहे. राज्यातील ग्रामविकास पंचायत राज विभागाच्या सहकार्यानं एक ते सात नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं जाणार आहे. या ग्रामसभांमध्ये मतदार यादीचं वाचन होणार असून त्या अंतर्गत नव्यानं नाव नोंदणीस पात्र असलेल्यांना आपली नावे नोंद करायची आहेत. तर दुबार नावं मृत व्यक्ती गावातून स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची नावं वगळण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.