महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठीच शिवसेनेला मतदान.. राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाची प्रतिक्रिया - Mumbai Municipal Ward Committee Election

वेळप्रसंगी सामान्य मुंबईकरांच्या हितावर आच आल्यास समाजवादी पक्ष विरोध करेल. परंतु, जातीवाद आणि धर्मवादाची पार्श्वभूमी असणाऱ्या भाजपच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील सत्ता स्थापनेच्या प्रयत्नांना कधीच यश येऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया शेख यांनी दिली.

भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी

By

Published : Oct 5, 2020, 8:59 PM IST

मुंबई- मुंबई महापालिकेच्या वैधानिक, विशेष आणि प्रभाग समित्यांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका भाजप लढवत असून त्यांचा सत्ता स्थापनेचा डाव उधळून लावण्यासाठी आणि भाजपला सत्तेच्या रिंगणाबाहेरच ठेवण्यासाठी शिवसेनेला मतदान केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव व समाजवादी पक्षाचे गटनेते आमदार रईस शेख यांनी दिली.

भारतीय जनता पक्ष हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लवकरच होऊ घातलेल्या वैधानिक समिती निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे. महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा भाजपचा डाव यातून उघड होऊ लागला आहे. स्वतःला मुंबईचे स्वयंघोषित पहारेकरी म्हणणारे भाजप नेते आता महापालिकेचे सत्ताधीश होऊ इच्छितात. पण, असे झाल्यास महानगरपालिकेच्या विकासात्मक कार्यपद्धतीस आणि गरिमेस धोका पोहोचू शकतो. भाजपच्या हुकूमशाही राजकारणामुळे आधीच देशाची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक चौकट विस्कटू लागली आहे. सार्वभौमिकता व धर्मनिरपेक्षता यांना धक्का पोहचून सामाजिक सर्वसमावेशकतेला आणि लोकशाही मुल्यांना पायदळी तुडवण्याचे काम वारंवार होत आहे. भाजप सत्तेत असलेल्या राज्यांमध्ये महिला सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. मुंबईसारख्या देशातील महत्वाच्या आणि आर्थिक केंद्रबिंदू असलेल्या महानगराच्या महापालिकेत भाजपासारख्या पक्षाने सत्तेत असणे त्यामुळेच हितावह नाही, असे राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव म्हणाल्या.

माहिती देताना समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख व राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच प्रगतीशील आणि विकसनशील कामाला प्राधान्य देणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. मुंबई शहरातील विकासात्मक कामांसाठी, इथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पक्षाने वेळोवेळी महानगरपालिकेत भूमिका मांडली आहे. त्यामुळेच भाजपचे धर्मांध, प्रतिगामी आणि कोणतीही आर्थिक दूरदृष्टी नसलेले राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही यशस्वी होऊ देणार नाही. मुंबई महानगराच्या दूरगामी विकासाचे आणि प्रगतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून, मुंबईकरांच्या हितास प्राधान्य देण्याच्या दृष्टीने भाजपला महानगरपालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवणे हा आमचा हेतू आहे. त्यादृष्टीने आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या बाजूने मतदान करण्याच्या निर्णय आम्ही घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तात्विक व सैद्धांतिक धोरणांनुसार जनतेच्या हितालाच कायम अग्रस्थानी ठेवण्याचा आमचा निर्धार आहे. आणि तो कायम राहील, असे राखी जाधव म्हणाल्या.

भाजपच्या सत्ता स्थापनेच्या प्रयत्नांना यशस्वी होऊ देणार नाही- आमदार रईस शेख

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्वयंघोषित पहारेकरी असणारे भाजप मागील एक आठवड्यापासून आपली भूमिका बदलत मनपाच्या वैधानिक समिती निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे. परंतु, जातीवाद आणि धर्मवादाची पार्श्वभूमी असणारे भाजप महानगरपालिकेमध्ये हिंदुत्ववादाचे आणि कट्टरपंथीय शैक्षणिक धोरणाचे राजकारण करत आहे. म्हणून अशा असंविधानिक राजकारण्यांना रोखण्यासाठी समाजवादी पक्ष सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्षता आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर काम करण्यास कटिबद्ध अशा समान किमान कार्यक्रम स्पष्ट असणाऱ्या महाविकास आघाडी सोबत आणि समान किमान कार्यक्रमाचे वचनपत्र देणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षासोबत आहे, असे समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते व आमदार रईस शेख म्हणाले.

तसेच, समाजवादी पक्ष हा मुंबईतील गोर गरिबांचा, कष्टकऱ्यांचा, सामान्यजनांचा पक्ष आहे. जनसामान्यांचे आणि मुंबईचे प्रश्न मांडणारा पक्ष आहे. त्यामुळे, महानगरपालिकेमध्ये गेली अनेक वर्षे समाजवादी पक्ष एक आक्रमक भूमिका घेणारा पक्ष म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे, वेळप्रसंगी सामान्य मुंबईकरांच्या हितावर आच आल्यास समाजवादी पक्ष विरोध करेल. परंतु, जातीवाद आणि धर्मवादाची पार्श्वभूमी असणाऱ्या भाजपच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील सत्ता स्थापनेच्या प्रयत्नांना कधीच यश येऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया शेख यांनी दिली.

हेही वाचा-'दलित अत्याचाराच्या प्रश्नांवर मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये'

ABOUT THE AUTHOR

...view details