महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुतण्याचा 'व्हाईस क्लोन' करुन अपहरणाचा रचला बनाव, अन् लुटले लाखो रुपये - अंधेरी पोलीस

Voice Cloning Scam : परदेशात राहणाऱ्या पुतण्याचा 'व्हाईस क्लोन' करुन अंधेरीच्या कंत्राटदाराला लुटल्यानं मोठी खळबळ उडाली. भामट्यांनी परदेशातील पुतण्याचं अपहरण केल्याचा बनाव केला, त्यानंतर खंडणीसाठी 3 लाख 70 हजार रुपये अकाउंटला भरण्यास सांगितले. पुतण्याचा आवाज क्लोन करुन ही थाप मारुन भामट्यांनी काकाला लुटलं आहे.

Voice Cloning Scam
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2024, 8:01 AM IST

मुंबई Voice Cloning Scam :सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशनवर परदेशात राहणाऱ्या पुतण्याचा 'व्हाईस क्लोन' करुन भामट्य़ांनी अपहरणाचा बनाव रचला. त्यानंतर कंत्राटदार काकाकडून खंडणीसाठी साडेतीन लाख रुपये लुटल्यानं मोठी खळबळ उडाली. जसवंत सिंग कलसी असं फसवण्यात आलेल्या कंत्राटदाराचं नाव आहे. ही घटना अंधेरीत उघडकीस आली. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिली.

अंधेरी पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 419, 420 अन्वये अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. - राज तिलक रोशन, पोलीस उपायुक्त

खात्यावर दहा लाख पाठवणार असल्याची मारली थाप :अंधेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जसवंत सिंग कलसी हे कंत्राटदार असून त्यांनी पोलिसांना सांगितलं की, "15 जानेवारीला सकाळी त्यांना एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला होता. त्या फोनवर परदेशात राहणाऱ्या त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलाचा आवाज काढून आरोपीनं त्यांना सांगितलं की, आपण 22 जानेवारीला काही व्यवसायाशी संबंधित कामानिमित्त भारतात परतत आहोत. त्यांच्या खात्यावर 10 लाख रुपये पाठवणार आहे, ही बाब वडिलांना सांगू नका, अशी विनंतीही आरोपीनं पुतण्या बोलत असल्याचं भासवून केली होती."

पुतण्याच्या अपहरणाचा रचला बनाव :अंधेरी पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, "त्याच दिवशी दुपारी पुतण्यानं तक्रारदाराला सांगितलं की त्यानं पैसे पाठवले आहेत. येत्या 24 तासात ते त्यांच्या खात्यात जमा केले जातील. त्यानंतर तक्रारदार दक्षिण मुंबईला गेल्यावर त्यांच्या पुतण्यानं त्यांना पुन्हा फोन करून जगमोहन नावाच्या व्यक्तीनं त्याचं अपहरण केल्याची माहिती दिली. पुतण्यानं तक्रारदाराला पाठवलेल्या पैशातून या व्यक्तीला खंडणीची रक्कम देण्यास सांगितलं. अन्यथा जगमोहन त्याचा पासपोर्ट नष्ट करतील." तक्रारदारानं पुतण्यानं सांगितल्याप्रमाणं केलं.

बँक खात्यात जमा केले साडेतीन लाख रुपये :पुतण्यानं फोनवर सांगितल्यानुसार जसवंत सिंग कलसी यांनी जगमोहनचा मित्र करणच्या बँक खात्यात 3.70 लाख रुपये जमा केले होते. पैसे दिल्यानंतर तक्रारदारानं आपल्या पुतण्याला फोन करून खंडणीची रक्कम जमा केल्याची माहिती दिली. पण यावेळी त्यांच्या पुतण्याचा आवाज वेगळा वाटला. त्यामुळं काहीतरी गडबड होत असल्याचं तक्रारदाराच्या लक्षात आलं.

व्हाईस क्लोनिंग करुन भामट्यांनी लुटलं :जसवंत सिंग कलसी यांनी त्यांच्या पुतण्याच्या नेहमीच्या संपर्क क्रमांकावर पैसे पाठवल्याची पावती पाठवली. यावेळी त्यांच्या पुतण्यानं ती पावती कशासाठी आहे, असं विचारलं. त्यानंतर जसवंत सिंग कलसी यांनी त्याला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यांच्या पुतण्यानं त्यांना सांगितलं की, ते कार्यालयात असल्यानं फोनवर उत्तर देऊ शकत नाहीत. त्यानंतर जसवंत सिंग कलसी यांना झालेला प्रकार लक्षात आला. त्यामुळं त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. अंधेरी पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 419, 420 अन्वये अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिली.

हेही वाचा :

  1. राजस्थानच्या व्यवसायिकाला शेअर मार्केट सल्लागार असल्याचं सांगून १ कोटीला घातला गंडा
  2. मुंबई हायकोर्टाच्या माजी मुख्य न्यायाधीशांना लिंक पाठवून सायबर चोरट्याने घातला गंडा
  3. वायग्रासारख्या औषधांची विक्री करण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फसवणूक, बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

ABOUT THE AUTHOR

...view details