मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यांच्यावर पालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना रुग्णालयातील कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशावेळी रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी या दोघांचे मनोधैर्य वाढवण्याची आवश्यकता असल्याने आपण रुग्णालयांना भेटी देत असल्याचे महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आज सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय म्हणजेच सायन रुग्णालयातील कोरोना बाधितांवर उपचार सुरू असलेल्या कक्षात जाऊन रुग्ण तसेच रुग्णांलयीन कर्मचाऱ्यांची वैयक्तिकरित्या विचारपूस केली, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी बोलताना कोरोनावर मात करण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांनी सिंहाचा वाटा उचलला असून शीव रुग्णालयातील रुग्ण तसेच रुग्णालयाची स्थिती कशी आहे? याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी याठिकाणी आलो असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
कोरोना बाधित रुग्ण तसेच परिचारिका व पॅरामेडिकल स्टाँफ यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांच्या काय सूचना आहे, आरोग्य सुविधांमध्ये काय सुधारणा करणे शक्य आहे? हे त्यांच्याकडून जाणून घेता आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अतिदक्षता विभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून याठिकाणी कंट्रोल रूममधून नियंत्रण करणे शक्य आहे का? याची पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रुग्णालयातील शवागारात जाऊन निर्धारित केलेल्या प्रणाली प्रमाणे काम होत आहे की नाही? याची पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले.
नीती आयोगाने मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १४.५ दिवसावर आला असल्याची माहिती आजच दिल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. केंद्र शासनाच्या दिशा निर्देशानुसार महापालिकेचे काम सुरू असून त्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे, सात दिवसानंतर रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे. यामुळे अधिक खाटा उपलब्ध होण्यात हातभार लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान येत्या मंगळवारपासून रुग्णांसाठी वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खाजगी रुग्णालयांनी आपले अतिदक्षता कक्ष महानगरपालिकेस वापरण्यास मुभा दिली असून यामुळे येथील खाटा मोठ्या संख्येने वापरण्यास मिळणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यापूर्वी मुंबईकर नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात ज्याप्रमाणे सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढे केल्यास कोरोनावर निश्चित मात करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दुसर्या जिल्ह्यातील डॉक्टर मोठ्या संख्येने मुंबईत येत असून डॉक्टरांची कोणतीही कमतरता नसल्याचे त्यांनी सांगितले.
सायन रुग्णालयात २८३ कोरोनाबाधित रुग्ण -