मुंबई Visakhapatnam Espionage Case :विशाखापट्टणम पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA ) मुंबईतून तिसरी अटक केली आहे. अमन सलीम शेख असं एनआयएनं मुंबईतून अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) सोमवारी विशाखापट्टणम हेरगिरी प्रकरणातील आरोपीला पाकिस्तानी ISI हेरगिरी नेटवर्कला संरक्षण माहिती लीक केल्याप्रकरणी ही अटक केली.
एनआयएचे मुंबईत छापे :एनआयएनं सोमवारी मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी केली. त्यासह एनआयएनं याच प्रकरणात आसामच्या नागाव जिल्ह्यातील होजई इथंही एका ठिकाणी छापे टाकले. त्यानंतर अमन सलीम शेखला मुंबईतून अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनं या प्रकरणातील आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. या प्रकरणी एनआयएनं यापूर्वीच दोन फरार पाकिस्तानी गुंडांसह एकूण चार जणांवर आरोपपत्र दाखल केलं आहे.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांचं सीमकार्ड केलं अॅक्टीवेट :रॅकेटमध्ये सहभागी असलेले पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी वापरत असलेलं सिमकार्ड सक्रिय करण्यात अमनचा सहभाग असल्याचं आढळून आलं. ही बाब 2021 मध्ये पहिल्यांदा उघडकीस आल्यानंतर आंध्र प्रदेशच्या काउंटर इंटेलिजन्स सेलनं गुन्हा नोंदवला होता. भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 120B आणि 121A आणि बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा, 1967 कलम 17 आणि 18 आणि अधिकृत गुप्तता कायदा, 1923 कलम 3 अंतर्गत 12 जानेवारी 2021 ला याची नोंद करण्यात आली. जून महिन्यात एनआयएनं हे प्रकरण हातात घेतलं होतं.