मुंबई Sea link Project: मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं वर्सोवा ते विरार (Versova Virar) हा सीलिंक प्रकल्प राबविण्यात येत आहे. वर्सोवात विरार सीलिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. त्यांचा प्रवास आरामदायी आणि वेगवान होणार आहे. मात्र, आता या सीलिंकचा विस्तार करण्याचं ठरवलं असून विरार ते पालघर पर्यंत हा विस्तार केला जाणार आहे. एमएमआरडीने वरळी ते वांद्रे, वांद्रे ते वर्सोवा आणि वर्सोवा ते विरार हा तीन टप्प्यातला सीलिंक प्रकल्प हाती घेतला असतानाच, आता या प्रकल्पाचा विस्तार पालघर पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.
निविदा प्रक्रियेला सुरुवात: विरार ते पालघर या नव्या सीलिंक प्रकल्पासाठी एमएमआरडीएने नुकतीच निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या प्रकल्पाचा खर्च त्यामुळे आता तीस हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील प्रकल्प हे एमएमआरडीएच्या माध्यमातून राबवले जातात. त्यामुळे या सीलिंकची जबाबदारी सुद्धा एमएमआरडीएकडे देण्यात आली आहे.