मुंबई - सध्या देशभरात निवडणुकीचा महासंग्राम सुरु आहे. त्यामुळे आचारसंहिता भंगाचेही प्रकार समोर येऊ लागले आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमधुन संबधीत राजकीय पक्षाचा प्रचार करणारा मजकूर दाखवल्यामुळे निर्मात्यांना निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सक्त ताकीद देण्यात आली आहे. अशा जाहिरात स्वरुपाचा मजकूर असल्यास, सक्षम प्राधिकाऱ्याकडून पूर्वप्रमाणित करुन घेतल्याशिवाय प्रसारित न करण्याचे आदेश दिले आहेत.
'अॅण्ड टीव्ही' या दूरचित्रवाणी वाहिनीवर दि. ४ आणि ५ एप्रिल, २०१९ रोजी प्रसारित झालेल्या 'भाभीजी घर पर है!' आणि 'झी टीव्ही'वरील दि. २ एप्रिल, २०१९ रोजी प्रसारित झालेल्या 'तुझसे हैं राब्ता' या मालिकेच्या भागामध्ये शासनाच्या योजनांचा प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे निवडणुक अधिकारी कार्यालयाने निर्मात्यांना याबाबत आदेश दिले आहेत. आदर्श आचारसंहितेतील तरतुदी आणि भारत निवडणूक आयोगाच्या अन्य निर्देशांचे काटेकोर पालन करण्याची सक्त ताकीद या मालिकांच्या निर्मात्यांना देण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने काँग्रेस पक्षाने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने 'भाभीजी घर पर है' आणि 'तुझसे हैं राब्ता' च्या निर्मित्यांना नोटीस बजावून आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा मागविला होता.