महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज यांच्या 'टुरिंग टॉकीज'ला शरद पवारांकडून भाषणाची स्क्रिप्ट,  तावडे यांची कोपरखळी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेली स्क्रिप्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाचत असल्याचा टोला भाजप नेते विनोद तावडे यांनी लगावला होता.

विनोद तावडे पत्रकार परिषदेत बोलताना

By

Published : Apr 17, 2019, 9:55 AM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेली स्क्रिप्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाचत असल्याचा टोला भाजप नेते विनोद तावडे यांनी लगावला होता. तसेच सोलापूरला एका हॉटेलमध्ये पवार आणि ठाकरे यांची भेट झाली असून यावेळी पवार यांनी पुढच्या भाषणाची स्क्रिप्ट ठाकरे यांना दिल्याची कोपरखळी तावडे यांनी मारली. ते भाजप प्रदेश कार्यलयात बोलत होते.

विनोद तावडे पत्रकार परिषदेत बोलताना

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथून माघारी येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला. सोलापूरच्या बालाजी हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या ‘टुरिंग टॉकिज’ची पुढची स्क्रिप्ट शरद पवार यांनी त्यांना दिली असावी, असे तावडे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात राज ठाकरे यांचे टूरिंग टॉकिजचे शो सध्या सुरु आहेत. सोलापूरला सोमवारी शो झाला व काही शो राज्यात इतरत्र होणार असल्याचे सांगतानाच तावडे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खर्च भाजपने निवडणूक आयोगाकडे मागितला नव्हता, तर राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खात्यात दाखविणार एवढीच मागणी आपण निवडणूक आयोगाला केली होती.

भाजपाने राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च मागितला असा समज मनसेचा झाल्यामुळे राज ठाकरे यांनी काल सोलापूरच्या सभेत मोदीं यांच्या सभांचा खर्च मागितला असावा. पण नरेंद्र मोदी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचाराचा खर्च हा निवडणूक आयोगाला पक्षाच्या खर्चातून नियमितपणे सादर होत असतो. मनसे बहुधा निवडणूक लढवत नसल्यामुळे हे त्यांच्या लक्षात आले नसेल. राज ठाकरे कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत हे मनसेने जाहीर करावे, असे आवाहनही तावडे यांनी यावेळी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details