महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विनोद तावडेंनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट - भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना युतीत घेण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी आज भाजपचे दूत बनून शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मागील काही दिवसांत ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत बरीच जवळीक वाढली आहे. त्यामुळे तावडे यांनी ही भेट घेतली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विनोद तावडे

By

Published : Feb 16, 2019, 3:49 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना युतीत घेण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी आज भाजपचे दूत बनून शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

तावडे यांची ही भेट एक सदिच्छा भेट असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, ठाकरे यांना जवळ करता येईल काय अथवा राष्ट्रवादी काँग्रेसपासून ठाकरे यांना थोडे दूर ठेवण्यासाठी भाजपकडून हा एक प्रयत्न असावा, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यापूर्वी तावडे शिवाजी पार्क येथील जागतिक मल्लखांब स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यानंतर तावडे यांनी थेट ठाकरे यांचे निवासस्थान गाठले. तावडे यांची ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या भेटीतून भाजप ठाकरे यांना गोंजारण्याचा प्रयत्न करत आहे, असे बोलले जात आहे.

मागील काही दिवसांत ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत बरीच जवळीक वाढली आहे. २ दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ठाकरे यांना आघाडीत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतल्याने भाजपला धक्का बसला आहे. यामुळेच आज भाजपकडून तावडे यांना दूत म्हणून पाठवून त्यासाठीचा एक अंदाज घेण्यात आला असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details