मुंबई -मनसेकडून विनाकारण खोटेनाटे आरोप केले जात आहेत. मात्र, राज ठाकरे यांचे मत पडले, तर काय मोठा फरक पडणार नाही. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचार सभांना जाणारे लोक केवळ टाईमपास, मनोरंजन आणि करमणुकीसाठी जातात, असे त्या सभेला जाणारी लोकच सांगतात. मात्र, त्यांच्या पक्षाप्रमाणे आमचा पक्ष टुरिस्ट टॉकिजचा पक्ष नाही, आमचा राजकीय पक्ष विचाराने चालतो, असा मार्मिक टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लगावला आहे.
राज ठाकरे यांच्या मताचा अधिकार सरकार काढतेय, असा जावईशोध मनसे नेते अभिजीत पानसे यांनी लावला होता. त्यांनाच प्रत्युत्तर देताना तावडे आज माध्यमांशी बोलत होते. पानसे यांना बहुधा ठाकरे या चित्रपटाची स्क्रिप्ट आठवली असेल. मात्र, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार काढून घेतला. त्यांनाच राज ठाकरे मते देण्याचे आवाहन करीत आहेत, अशी टीकाही तावडे यांनी यावेळी केली.
नोटाबंदी राज ठाकरे यांना का झोंबली आहे? जे सगळे पैसे बँकेत आले ते कोणाकोणाच्या नावाने आले, त्याची माहिती त्यांनी घेतली पाहिजे. विनाखाते फिरणारे पैसे खात्यात जमा झाले. याचाच अर्थ काळा पैसा जमा झाला असल्याचे तावडे म्हणाले. यासाठी अर्थकारण समजून घ्यावे, ते समजले नाही, की अशी गडबड होते, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.