मुंबई - शरद पवार यांनी ४० वर्षे सत्तेत राहून जे काय कमावले, ते घरात ठेवले आहे, असा गंभीर आरोप शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार मनोज कोटक यांचा अर्ज भरण्यासाठी तावडे यांच्यासह प्रकाश मेहता, लिलाधार डाके, राम कदम, किरीट सोमय्या, आमदार सुनिल राऊत, अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा एक टप्पा पुढील प्रचार सेना, भाजप, रिपाई, रासप आणि महायुतीचा सुरू आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असल्याने मुंबईकर मतदार सहाच्या सहा जागी महायुतीचे खासदार निवडून देतील, असा विश्वास तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.
शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि भाजपचे उमेदवार मनोज कोटक माध्यमांशी संवाद साधताना मागील आठवड्यात या ठिकाणी जे वातावरण होते ते वातावरण आता राहिलेले नाही. किरीट सोमय्या यांच्यासह सर्व कार्यकर्ते एक दिलाने कामाला लागले आहे. ईशान्य मुंबईसह सर्व सहाच्या सहा जागा भाजप-शिवसेना महायुती जिंकेल, असे तावडे म्हणाले. काँग्रेसच्या मिलिंद देवरा व प्रिया दत्त यांना निवडणुकीत लढायचे नव्हते तरीही उभे केले आहे. उर्मिला मातोंडकर यांना गोविंदा जिंकला त्या प्रमाणे तुम्हीही जिंकाल असे सांगून त्यांना बकरा बनवले गेले. त्यामुळे काँग्रेसचा प्रचारच होत नाही. यामुळे मुंबईकर सहाच्या सहा खासदार मोदींच्या दिमतीला पाठवतील, असे तावडे म्हणाले.
राहणीमान उंचावण्याचे काम करणार - मनोज कोटक
देशाच्या जनतेने ठरवले आहे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. महाराष्ट्रात त्याप्रमाणे मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि आरपीआयचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आज उमेदवारी अर्ज भरायला जी गर्दी होती त्यात मतदारांची संख्या जास्त होती. जिंकून आल्यावर सामान्य नागरिकांचे राहणीमान उंचावण्याचे काम करणार असल्याचे भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांनी म्हटले आहे.