मुंबई : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी ( Former cricketer Vinod Kambli ) याने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना एका गाडीला टक्कर मारली होती. त्यानंतर रविवारी त्याला (27 फेब्रुवारी) वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला जामीनावर सोडण्यात आले होते. आता या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
विनोद कांबळीचा नशेत वाद घालतानाचा व्हिडीओ विनोद कांबळीची त्या दिवसाची अवस्था दाखवणारा व्हिडीओ ( Vinod Kambli video goes viral )आता व्हायरल झाला आहे. लाल शर्ट आणि हाफ पँट घातलेला विनोद या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसत आहे. विनोद दारूच्या नशेत असून, तो त्या अवस्थेतच सोसायटीच्या बाहेर जातो आणि रस्त्यावरील कारला धडकतो.
तेव्हा सोसायटीच्या प्रवेशद्वारावर गाडी धडकवल्याच्या प्रकारानंतर त्याने सोसायटीचा वॉचमन आणि काही रहिवाशांबरोबर वाद घातला. हा वाद पुढे पोलीस ठाण्यात गेला. त्यानंतर त्यांच्यावर वांद्रे पोलीस ठाण्यात भादंवि कलम 279 (बेदरकारपणे वाहन चालवणे), कलम 336 (दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणे) आणि कलम 427 (नुकसान पोहोचवणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान त्याला अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
या आधीही विनोद कांबळी अनेकदा वादात अडकला आहे. 2015 मध्ये त्याच्यासह पत्नी एंड्रिया हेव्हिट यांच्याविरुद्ध कामवाल्या बाईने गंभीर आरोप केले होते. त्यावरून एफआयआर देखील दाखल झाला होता. काम करणाऱ्या बाईने कामाचे पैसे मागितले, म्हणून तिला तीन दिवस खोलीत बंद केल्याचा आरोप दोघांवर होता. पण, या दोघांनी तिच्यावर ड्रग्स घेत असल्याचा आरोप केला होता.