मुंबई :मुंबईतील वांद्रे पोलिसांनी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पोलिसांनी विनोद कांबळी यांची पत्नी अँड्रिया हिच्या जबानीवरून भादंवि कलम ३२४ आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. विनोद कांबळीची पत्नी अँड्रिया हिने विनोदवर दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
पत्नी अँड्रियाला मारहाण : याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. विनोद कांबळी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे, यावेळी त्याच्या पत्नीने मुंबईच्या वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याने दारूच्या नशेत आपल्या फ्लॅटमध्ये तिच्यावर अत्याचार आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
नक्की आरोप काय? : आरोप करताना अँड्रिया यांनी म्हटले आहे की, विनोद कांबळीने स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल तिच्यावर फेकले त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान घडली. जेव्हा कांबळी हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये पोहोचला आणि त्याने पत्नीला शिवीगाळ केली. यानंतर तो किचनमध्ये धावत गेला आणि स्वयंपाक घरातील पॅनचा हँडल घेऊन ते पत्नीवर फेकले. वांद्रे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस येण्यापूर्वी कांबळीच्या पत्नीने स्वतःवर भाभा रुग्णालयात उपचार करून घेतले होते.
विनोद कांबळी यांना प्रश्न विचारणार :वांद्रे पोलीसांकडून विनोद कांबळी यांना सीआरपीसी कलम 41A ची नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना एक-दोन दिवसांत पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवण्यास सांगितले आहे. पोलिसांना सध्या या घटनेचा एक पैलू माहित आहे. जो विनोद कांबळीच्या पत्नीने पोलीसांना तक्रारीत सांगितला आहे. विनोद कांबळी यांना त्यासंबंधित प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
याआधीही अनेक आरोप झाले : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या विरोधात याआधीही फेब्रुवारी 2022 बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. राहत्या सोसायटीच्या गेटवर आपल्या कारने धडक दिली होती. त्यावरून वाद झाला होता. सुरू असलेल्या वादा दरम्यान विनोद कांबळीने तेथील नागरिकांना शिवीगाळ केली होती. याप्रकरणी सोसायटीच्या लोकांनी कांबळीविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी कांबळीला अटकही केली होती. मात्र, विनोद कांबळी याला जामीनदेखील मिळाला होता.
सायबर चोरीचा शिकार झाला :माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची सायबर चोरांनी फसवणूक झाली होती. केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने कांबळी याच्या बँक खात्यामधून सायबर चोरांनी १ लाख १४ हजार रुपये परस्पर वळविले होते. याप्रकरणी कांबळी यांने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. कोटक महिंद्रा बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँक खात्याचे केवायसी अपडेट नसल्याची माहिती फसवणूक करणाऱ्याने दिली होती. केवायसी अपडेट न केल्यास खात्यामधील व्यवहार बंद होतील असे त्याने सांगितली होते. पैसे जमा झाल्यानंतर समोरील व्यक्तीने कांबळीसोबतचा संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कांबळी याने वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.
हेही वाचाा :FIR Against Vinod Kambli : भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल