मुंबई - शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धवल ठाकरे यांच्याकडे मेटे यांनी हा राजीनामा सुपूर्द केला. तसेच सत्तेत आलेल्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी वेळ नाही. यासाठी मी ३ पत्रे सरकारकडे पाठवली, पण त्यालाही सकारात्मक उत्तर न दिल्यामुळे मी आज समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे मेटेंनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभे राहावे, यासाठी ३ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रात उद्घाटन झाले होते. मात्र, आतापर्यंत हे स्मारक उभे राहू शकले नाही. त्यातच सरकार बदलले असल्याने या स्मारकाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. याकडे सरकार लक्ष देत नसल्याचे मेटे म्हणाले. त्यामुळे त्यांनी आज (बुधुवार) छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजवणी, देखरेख व समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
छत्रपती शिवरायांचे स्मारक उभे राहावे, अशी राज्यातील तमाम शिवप्रेमी आणि माझी इच्छा आहे. मात्र, सरकार बदलले असल्याने यासाठी माझी अडचण होऊ नये, म्हणून मी हा निर्णय घेतल्याचे मेटे म्हणाले. मागील काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी उशीर झाला, ही मला आणि शिवप्रेमीला मोठी खंत आहे. परंतू, राज्यातील आत्ताचे सरकार इतर सर्व स्मारकाच्या आढावा घेत आहे. त्यासाठी अनेक मोठे नेते जात आहेत. तेच नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी उदासीन असल्याचा आरोपही मेटेंनी केला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्यासाठी काही निविदांमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात असेल, त्याची चौकशी व्हावी. यासाठी कोणी विरोध केला नाही. त्यामुळे चौकशीसाठी कोणाची अडचण नाही. मात्र, जे काम सुरू झाले नाही, त्याची काय चौकशी करणार असा सवालही मेटेंनी उपस्थित केला.