महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'2047 पर्यंत भारत विकसित देश होणार'; पंतप्रधान कार्यालयाच्या मुख्य सचिवांनी व्यक्त केला विश्वास - मुख्य सचिव

Viksit Bharat Sankalp Yatra : भारत 2047 पर्यंत विकसित देश होणार आहे. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग गरजेचा आहे, असं वक्तव्य पंतप्रधान कार्यालयाचे मुख्य सचिव डॉ पी के मिश्रा यांनी मुंबईत केलंय.

Chief Secretary PMO
Chief Secretary PMO

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 7:25 AM IST

मुंबई Viksit Bharat Sankalp Yatra : सन 2047 पर्यंत भारत विकसित देश होणार आहे. हा टप्पा गाठताना भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण व्हावा, लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'विकसित भारत संकल्प यात्रा' सुरु करण्यात आलीय. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग गरजेचा आहे, असं वक्तव्य पंतप्रधान कार्यालयाचे मुख्य सचिव डॉ पी के मिश्रा यांनी केलंय. ते महापालिकेच्या पी उत्तर विभागाच्या विविध 'शासकीय योजनांच्या लाभार्थ्यासोबत संवाद' या कार्यक्रमात सहभागी झाले होते, यावेळी त्यांनी बोलताना हे वक्तव्य केलंय.


विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन : संपुर्ण देशभरात 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत 'विकसित भारत संकल्प यात्रे'चं आयोजन करण्यात आलंय. त्यासाठी केंद्र शासनानं विशेष स्वरुपाची वाहनं तैनात केली आहेत. बृहन्मुंबईतील 227 प्रभागांमध्ये विशेष चार वाहनांद्वारे 28 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 पर्यंत या यात्रेचं नियोजन करण्यात आलंय. याचाच एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पी उत्तर’ विभागातील स्थानिक नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख सचिव डॉ पी के मिश्रा यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला.

विकसित भारत संकल्प यात्रेत 9 कोटी नागरिक जोडले : कार्यक्रमाच्या सुरुवातीला चित्रफीतीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश दाखविण्यात आला. 'विकसित भारत संकल्प यात्रे'बाबत डॉ पी के मिश्रा म्हणाले की, "विकसित भारत संकल्प यात्रा अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी मुंबई महानगरपालिका खूप प्रयत्न करतंय. त्यासाठी मुंबई महानगरपालिकाचं अभिनंदन करतो. इथं व्यासपीठावर लाभार्थ्यांचे अनुभव ऐकताना ही यात्रा तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे, याबाबत आनंद वाटला. सन 2047 पर्यंत आपण एक विकसित राष्ट्र होऊ शकतो, याबाबत नागरिकांमध्ये विश्वास आणि जनजागृती निर्माण करणं गरजेचं आहे. तेच काम आपण विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे करीत आहोत. या यात्रेत आतापर्यंत 9 कोटी नागरिक जोडले गेले आहेत. दोन कोटीपेक्षा जास्त नागरिकांची या यात्रेदरम्यान आरोग्य तपासणी करण्यात आलीय. आपल्या देशातील युवक, महिला, सुशिक्षित बेरोजगार, उद्योजक यांना याद्वारे आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी मिळालीय," असंही त्यांनी नमूद केलंय.

अनेक योजनांची दालनं : कार्यक्रमादरम्यान 'संकल्प शपथ' घेण्यात आली. तसंच 'मेरी कहानी मेरी जुबानी' या अंतर्गत प्रातिनिधिक स्वरुपात चार लाभार्थ्यांनी मान्यवरांसमोर अनुभव मांडले. त्यानंतर मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजना, आयुष्मान कार्ड लाभार्थी, दिव्यांग लाभार्थी आदींना प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र आणि धनादेश वाटप करण्यात आले. तसंच पाच महिला लाभार्थ्यांना शिलाई संयंत्राचं वितरण करण्यात आलं. आरोग्य तपासणी, उज्ज्वला योजना, विविध क्रीडा योजना, आधारकार्डशी संबंधीत कामकाज आदींची दालनं कार्यक्रमस्थळी उभारण्यात आली होती. या सर्व दालनांना डॉ मिश्रा यांनी भेट दिली. तसंच दालनांवर उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून कोणकोणत्या योजनांना नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय, याबाबत देखील त्यांनी माहिती घेतली.

हेही वाचा :

  1. PM मोदी दोन दिवसांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर; समुद्रकिनाऱ्यावर लुटला आनंद, पाहा भन्नाट फोटो
  2. 'तीसरी बार मोदी सरकार', लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा नवा नारा

ABOUT THE AUTHOR

...view details