मुंबई - डोंगरी परिसरतील केसरबाई इमारत दुर्घटनेला म्हाडा, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार जबाबदार आहे. संबंधित सर्वांवर खूनाचा गुन्हा दाखल करावा आणि मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
दोषींवर खूनाचा गून्हा दाखल करावा - विजय वडेट्टीवार आज घटनास्थळाला भेट दिल्यानंतर वडेट्टीवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, की आजच्या दुर्घटनेत 12 निरपराध जीवांचा बळी गेला. ही दुर्दैवी घटना आहे. अद्यापही 40-50 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती स्थानिक लोकांनी व्यक्त केली. शंभर वर्ष जुन्या असलेल्या केसरबाई इमारतीत 15 कुटुंबे राहत होती. ही इमारत धोकादायक होती पण मुंबई महानगरपालिकेने फक्त नोटीस बजावण्याचे काम पार पाडले. या इमारतीचे वेळीच ऑडीट करुन पुनर्विकास केला असता तर आजची दुर्घटना टाळता आली असती. मात्र, प्रशासन योग्यवेळी कधीच कारवाई करत नाही.
दुर्घटनेनंतर आता सरकारचे मंत्री भेटी देऊन चौकशी करण्याची भाषा करत आहेत. पण दुर्घटना होऊ नये, म्हणून ठोस उपाययोजना का केल्या नाहीत. मुंबई महानगरपालिका प्रशासन झोपा काढते आणि दुर्घटना झाल्यावर कारवाईचे नाटक करते, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
मुंबईत 14 हजार इमारती अति धोकादायक आहेत. या इमारतीतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. यासंदर्भात विधानसभेतही प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांना वारंवार पत्र पाठवले, डोंगरी भागातील धोकादायक इमारतीसंदर्भातही महानगरपालिकेला पत्र पाठवून या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे, अशा इमारतींचा पुनर्विकास करावा, यासाठी पाठपुरावा करुनही त्याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत आतापर्यंत 40 च्या वर लोकांचे वेगवेगळ्या दुर्घटनेत बळी गेले आहेत. गटाराचे झाकण उघडे असल्याने त्यात पडून दोन मुलांचा मृत्यू झाला. आणखी किती बळी गेल्यावर मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारला जाग येणार आहे, असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई महानगरपालिकेत 25 वर्षांपासून शिवसेना-भाजपची सत्ता आहे. पण दरवर्षी पावसाळ्यात इमारत दुर्घटना होऊन निष्पाप लोकांचे बळी जातात. दरवर्षी अशा दुर्घटना झाल्यानंतर चौकशीचा फार्स केला जातो, किरकोळ कारवाई केली जाते. पण ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. महानगरपालिका, राज्य सरकारची यंत्रणा असताना बेकायदा बांधकामे फोफावतातच कशी? असा सवाल त्यांनी विचारला.
मुंबई महानगरपालिकेच्या या गलथान कारभारामुळेच दरवर्षी पावसाळ्यात निष्पाप लोकांचे जीव जातात. डोंगरी भागातल्या या इमारतीचाही वेळीच पुनर्विकास केला असता तर आजची दुर्घटना टळली असती, असे वडेट्टीवार म्हणाले.