मुंबईVijay Wadettiwar On Sudhir Mungantiwar: लंडन स्थित 'व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट' वस्तुसंग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखे (Wagh Nakh) नोव्हेंबर २०२३ मध्ये भारतात आणली जातील, असं यापूर्वी सांगण्यात आलं होतं. यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये व्हिक्टोरिया अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाशी सामंजस्य करार सुद्धा केला होता. या करारामध्ये नोव्हेंबर 2023 पासून तीन महिने वाघनखे भारतात राहतील असं नमूद करण्यात आलं होतं. परंतु या प्रक्रियेस आता विलंब होत असल्यानं ही वाघनखे यावर्षी मे महिन्यामध्ये भारतात येतील अशी माहिती समोर आली आहे. यावरून विरोधी पक्ष नेते, विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ट्विटद्वारे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काय आहे वडेट्टीवार यांच्या ट्विटमध्ये: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारला टोला लगावला आहे. वडेट्टीवार म्हणाले आहेत की, नोव्हेंबर गेला, जानेवारी पण हुकला, परंतु सुधीर भाऊ वाघनखे कुठपर्यंत पोहोचली? सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून तुम्ही वाघनखे आणायला लंडनला गेलात. परंतु रिकाम्या हाताने परत आलात. तेव्हा वाघनखे नोव्हेंबरमध्ये भारतात येतील, असं तुम्ही सांगितलं होतं. तो महिना सुद्धा गेला. वर्षही संपलं आता २०२४ उजाडलं आहे. त्यामध्ये जानेवारीचा मुहूर्त सुद्धा हुकला आहे. परंतु वाघनखे काही आली नाहीत. आता परत एकदा लंडनवारी करणार की, तुम्ही पुढची तारीख देणार? असा प्रश्नही ट्विट करत वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.