मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना बाजूला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक प्रयत्न करीत आहेत. मोदींनी गडकरींना राज्यपालपदाची ऑफर दिली होती, मात्र, गडकरींनी राज्यपालपदाची ऑफर (Nitin Gadkari rejected offer post of Governor) नाकारल्याचा दावा विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका करत भाजपाला निवडणुकीची भीती वाटत असल्याचा आरोप केला.
मोदी सरकारची नाचक्की : केंद्र सरकारच्या सात योजनांवर देखील वडेट्टीवार यांनी ताशेरे ओढले आहेत. या योजना रस्ते विकासाशी संबंधित आहेत. त्यामुळे केंद्र सरकारची नाचक्की झाली असून केंद्र सरकारने आता भ्रष्टाचाराला उत्तर दिले पाहिजे. तत्कालीन काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांनी मोठे आरोप केले, मात्र त्यात काहीच तथ्य नव्हते. आता यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार. स्वतःला चौकीदार म्हणणारे कसे भ्रष्टाचारी आहे, हे देशासमोर येत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
गडकरींना राज्यपाल पदाची ऑफर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संबंध किती सौहार्दपूर्ण आहेत, हे साऱ्या देशाला माहीत आहे, नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी त्यांच्या विभागाला अडचणीत आण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. नितीन गडकरी यांना भाजपाने राज्यपालपदाची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली, असे वडेट्टीवार म्हणाले.