प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार आणि सुषमा अंधारे मुंबईVijay Wadettiwar And sushma Andhare Reaction:नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) सत्ताधारी बाकावर बसल्यामुळं महाविकास आघाडीतील नेत्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर भाजपाला लक्ष केलं. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहून मलिकांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली.
अजित पवारांना फडणविसांचा थेट संदेश: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जामीनवर असलेले नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसण्यावरून प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं. माजी मंत्री, विधानसभा सदस्य नवाब मालिक यांनी आज अधिवेशनाच्या कामकाजात सहभाग नोंदविला, तो त्यांचा अधिकारच आहे. त्यासोबतच आपली त्यांच्याशी कोणतीही वैयक्तिक शत्रुता नसल्याचं पत्राच्या सुरुवातीस फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मात्र ज्या प्रकारे त्यांच्यावर आरोप होत आहेत ते पाहता त्यांना महायुतीत घेणं योग्य नसल्याचं मत फडणवीस यांनी पत्रात व्यक्त केलं आहे.
या गोष्टीला आमचा विरोध :सत्ता येते आणि जाते पण देश महत्त्वाचा आहे. मलिक केवळ वैद्यकीय आधारे जामीनावर बाहेर आहेत. आरोप सिद्ध न झाल्यास त्यांचे आपण स्वागत करू, मात्र अशा प्रकारचा आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं योग्य होणार नसल्याचं स्पष्ट मत फडणवीस व्यक्त केलं आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हा सर्वस्वी अधिकार आपला असून महायुतीला याची बाधा पोचणार नाही याचा विचार देखील महायुती घटक पक्षांना करावा लागेल. त्यामुळं या गोष्टीला आमचा विरोध असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपखाली अटक झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा असल्याचं त्यांनी अजित पवारांना उद्देशून म्हटलं आहे.
सोबत हवे पण जवळीक नको : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचं सत्ताधारी बाकावर बसणं, त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पत्र यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. नवाब मलिक यांना पुरवणी मागण्यात निधी दिला आहे. आता जे ट्विट केले, ते आमच्या बरोबर नाहीत म्हणून हे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. तसेच महायुतीमधील आमदारांना मतदार संघाच्या विकास कामासाठी जशाप्रकारे निधी दिला जातो, तशा प्रकारे मलिक यांनाही निधी मिळाला आहे. भाजपावर आरोप होऊ नये म्हणून हे ट्विट केलंय. देशद्रोही म्हणून उल्लेख केला, देशद्रोही माणूस बाजूला बसला तर प्रश्न निर्माण होणारच. सोबतही हवेत पण जवळही नको असा हा प्रकार असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. नवाब मलिक यांनी प्रतिज्ञापत्र देऊन अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे, ते महायुती बरोबर आहेत. त्यामुळं नवाब मलिक कुठे राहतील हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे.
जयंत पवार यांचा टोला - शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीही या पत्रावरुन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची फिरकी घेतली आहे. वास्तविक ही गोष्ट फोन करुन किंवा प्रत्यक्ष फडणवीस अजित पवार यांना सांगू शकले असते. मात्र त्यांनी थेट पत्र लिहिलं. त्याही पुढे जाऊन हे पत्र व्हायरल करण्यात आलं. याचा अर्थ तुमचं जे काही म्हणणं आहे ते थेट जनतेलाच सांगा असा सूर फडणवीस यांचा दिसत आहे. यावर अजित पवार काय भूमिका घेतात ते पाहावे लागेल.
अजित पवार यांच्याबाबत कोणाला पत्र लिहिणार: नवाब मलिक यांच्या अजित पवार गटाच्या सोबत येण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. देवेंद्र फडणवीस ट्रोल झाल्यानंतर त्यांनी पत्र लिहिलं. आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांवर भाजपाने आरोप केले त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेकवाद कुठे गेला होता. अजित पवारांनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्याचा आरोप केला होता. एवढा गंभीर आरोप झाल्यावर ही त्यांना सत्तेमध्ये सामावून घेणं हे तुमच्या नेतृत्वामध्ये बसले होते का? आणि त्यावेळेला सत्तेपेक्षा देश मोठा हे तुम्हाला तत्त्वज्ञान का सुचले नाही. अजित पवारांना सत्तेत सामावून घेणं चुकीचं आहे असं सांगणारे पत्र देवेंद्र फडणवीस आपण भाजपाच्या कोणत्या नेत्याला लिहिणार असल्याचा सवाल त्यांनी फडणवीस यांना विचारला आहे.
हेही वाचा -
- देवेंद्रभाऊ, सरडेसुद्धा लाजून आत्महत्या करतील, सुषमा अंधारे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
- नवाब मलिक अजित पवार गटात! मलिकांची विकासाला साथ
- “जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, अजित पवार गटाची आव्हाडांवर जहरी टीका