मुंबई- मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने काल (7 ऑगस्ट) २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली. मात्र मुंबईत पाणी कपात लागू केलेल्या दिवशीच मुसळधार पाऊस आल्याने महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे दोन तलाव भरले आहेत. यातील विहार तलाव काल रात्री १० च्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागले, तर तुळशी तलाव देखील भरले आहे.
मुंबईला भातसा, मध्य वैतरणा, तानसा, विहार, मोडक सागर, तुळशी या 7 तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी विहार तलाव हे मुसळधार पावसामुळे पूर्णतह भरले होते. विहार तलाव हा दोन सर्वात लहान तलावांपैकी एक असून यापैकी तुळशी तलाव हा दुसरा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर म्हणजेच, ९ कोटी लीटर एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.