मुंबई- विधानसभेचे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराबाबत चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. या दोन्ही विषयांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र प्रश्नोत्तरांचा तास झाला पाहिजे, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. फडणवीसांचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर विरोधकांनी वेलमध्ये येत जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळातच सध्या विधानसभेचे कामकाज सुरू होते. पण, गदारोळ वाढल्याने सभागृह 15 मिनिटासाठी तहकूब केले. नंतर कामकाजास सुरुवात झाली. पण, गोंधळ वाढल्याने विधानसभा अध्यक्षांना पुन्हा सभागृह तहकूब कारावे लागले. दोनदा तहकुबीनंतर सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी महत्वाची विधेयके मंजूर करून घेण्यात आली. नंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
कर्जमाफी, महिला अत्याचाराबाबत विधानसभेत विरोधकांचा गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब - विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस
शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचार प्रश्नाबाबत विधानसभेत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. त्यामुळे दोन वेळा १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
ठरल्या वेळेप्रमाणे सभागृहाचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी आणि महिलांसंदर्भात वाढलेल्या गुन्हावर सरकारला धारेवर धरले. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्यांना २५ हजार हेक्टरी, आश्वासन देण्यात आले होते. त्याचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला. सध्या कर्जमाफीची जी योजना आहे, त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. ऑक्टोबरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी अडचणीत आला होता. त्यालाही या कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय, महिलांवरील वाढत्या अत्याचारांविषयीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी, यासाठी सरकार काय करत आहे, याची विचारणा त्यांनी केली. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून या दोन विषयांवर सरकारने चर्चा करावी, अशी मागणी फडणवीसांनी केली.
हे दोन्ही विषय गंभीर असून यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. चर्चेचा वेळही ठरलेली आहे, असे सांगत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांची तातडीच्या चर्चेची मागणी फेटाळून लावली. शिवाय, प्रश्नोत्तरांचा तासही पुकारला. यावेळी, विरोधकांनी वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळातच सभागृहाचे कामकाज सुरू होते. गोंधळ कायम राहिल्याने विधानसभा अध्यक्षांना सभागृह दोन वेळा तहकूब करावे लागले. काही वेळानंतर सभागृहाच्या कामकाजास सुरुवात झाली आहे.